वर्ग आणि वर्णभेदाविरूद्ध नवीन आकलन घेवु आलेला #काला

रजनीकांतचा काला चित्रपट तुम्ही पाहिला असेलच पण नसेल पाहिला तर पहा. तसा हा 7 जूनला प्रदर्शित झालेला पण मला पाहता आला नाही. तसपण असे चित्रपट चित्रपटगृहावर जास्त वेळेसाठी उपलब्ध होत नाहीत. पण आता युट्युबवर मी काल पाहिला. रजनीकांतची स्टाईल, त्याचा हटके अंदाज, तांत्रिक दृष्ट्या साधनांचा वापर इ. वगळता. चित्रपटाच कथानक आणि संवादाच्या माध्यमातुन प्रतिकात्मक रित्या या व्यवस्थेवर केलेले प्रहार याची चर्चा मला या ठिकाणी आवश्यक वाटते.  प्रथम या कथेच कथानक आपण लक्षात घेवु. कहाणी सुरू होते, तीच मुळात धरणा प्रदर्शन करीत असलेल्या दृश्यापासुन यामध्ये धारावी झोपटपट्टीमधील लोक ,त्या ठिकाणी सरकार आणि बिल्डर मिळुन त्यांची राहती जमीन हडप करण्याच्या प्रयत्नात असतात, बुलडोजर लावुन पोलिस बंदोबस्तात तो झोपड्या पाडण्याचा प्रयत्न चालु असतो. त्याविरोधात ते लोक कपडे आपटुन शांतपणे धरना देत असतात. त्यांची मागणी साधी असते, आम्ही इथले रहिवासी आहोत, या जमिनीवर आमचा हक्क आहे. आमचा अस्तित्वाचे आधार सगळे इथेच आहेत. पण प्रचंड नफेखोरीची नशा चढलेले. भांडवलवादी राजकारणी, बिल्डर ,व्यावसायिक याना मात्र हे रूचत नाही. त्यानी फक्त ती जमीन हवी असते . यासाठी ते पोलिसांचाही पद्धतशीरपणे वापर करून घेत असतात. या पार्शभुमीवर रजनीकांतची नायक म्हणुन एंट्री खुपच भावुन जाते. आणि कथा उलगडत जाते. कालिकरण- काला (रजनीकांत) नायक  म्हणुन या कथानकाशी जोडला जातो. काला याठिकाणी त्या तमाम वर्गसंघर्षामध्ये सामान्यांच शोषितांच नेतृत्व करणार्या व्यक्तिमत्वांच उमदं प्रतिनिधित्व करतो. कथा, नायक आणि खलनायकाच्या संघर्षादरम्यान पुढ पुढ सरकत राहते. धरना प्रदर्शनाने काही होत नाही, त्याउलट धारावी भागामध्ये काला दादाचा वचक व अलोट जनप्रेमाच्या पुढे किमान यावेळी भांडवली प्रवृत्तीना माघार घ्यावी लागते. यामध्ये लोकशाहीची शोकांतिका स्पष्ट झालेली आहे. धरणा, प्रदर्शन, उपोषण या मार्गाना इथली प्रस्थापित सरकारे कधीच भीक घालीत नाहीत. त्यांच्या लेखी ही निव्वळ दमनतंत्राचा वापर करून सहजपणे चिरडुन टाकु शकण्याजोगे लोकांचे उठाव असतात. ( याला वर्तमानकालीन संदर्भही खुप ताजे आणि भरपुर आहेत. मागेच 1 ते 2 महिन्यापुर्वी दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्या शेतकर्यांवर लाठीचार्ज केला, हात पाय मोडले इ. )पण त्यावेळी घेतलेली माघार आणि हेतु तडीस न गेल्याचा सल यांच्या मनात राहतोच. बदल्याची ही मुलभुत मानवी प्रवृति ही यातुन दिसुन येते. त्याशिवाय संघर्ष ही पुर्णच होणार नाही.
या संघर्षाच्या ठिणगीनंतर मग व्यवस्था झपाटुन कामाला लागते. दरम्यान काही दृश्य व संवादातुन लोकशाहीची खुपच आदर्शवादी संकल्पना बाळगणार्या पण त्याचबरोबर जनतेप्रती पोटतिडीक असुनही हतबल असलेल्या व्यक्तिमत्वाची झलक इथे दिसते. चित्रपटामध्ये कालाचा मुलगा म्हणुन असणारा लेनिन या भुमिकेत दिसतो. व्यवस्थेमागची व्यवस्था व सत्तासबंधा मागचे लागेबांधे, धागेदोरे याचा काहीच आचपेच नसलेला पण लोकशाहीवादी, आदर्शवादी तरूण म्हणुन तो या भुमिकेत वावरतो. जेव्हा धारावी झोपटपट्टी खाली करून त्याऐवजी दुसर्या ठिकाणी प्रशस्त जागेत फ्लैट बांधुन तिथे धारावीवासियांच पुर्नवसन करण्याचा प्रकल्प एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन आणला जातो. तेव्हा हा तरूण हुरळुन जातो. आणि लोकांना हे कितपत योग्य आहे ते समजवण्याच्या प्रयत्न करत असतो. पण कालाच व्यवहारवादी राजकीय आकलन मोठं असत, यामागचे हितसंबंध तो जाणुन असतो. तो या प्रकल्पाला विरोध करतो. आणि त्यांचा डाव उधळुन लावतो. तेव्हा हा भाबडा तरूण संतापतो, क्षणभर त्याला बापाचा रागही येतो, तेव्हा काला त्याला समजावताना जी डायलॉगबाजी करतो त्यातुन खुप काही प्रतित होत. यात तो म्हणतो, '' अपनी जडे यही है, अपनी जडों को पहेचानना सिखो. '' यातुन आपला ऐतिहासिक संस्कृतिसंघर्ष आणि मुलनिवासी म्हणुन आपली असणारी ओळख याचे हरवत चाललेले भान परत जागवण्याची गरज असल्याचं सांस्कृतिक अंगाने असणारी गरज तो विषद करतो. यात खलनायक म्हणुन नाना पाटेकर यांनी हरीदादा अप्रतिम साकारलाय. जेव्हा तो कालाच्या घरी त्याला भेटायला येतो तेव्हा तो त्याच्याघरच पाणीही पित नाही. ब्राम्हण्य , त्याच्या जोडीला वर्णवाद (Racism) आणि भांडवली हेतुने झपाटलेला अंतस्थ कुटील राजकारणी. हा प्रत्यक्षात आपल्या आजुबाजुला वावरणारा एखादा राजकारणी फिरत फिरत सरळ पडद्याच्या आत आलाय की काय अस वाटाव एवढ ते पात्र नानानी अप्रतिम साकारलय. तो कालाच्या घरी जातो, येताना त्याची नाकेबंदी केली जाते, तेव्हा त्याचा चमचा त्याला म्हणतो, " दादा, हम चारों तरफ से घिर गये है, इन लोगोंको भुनकर ही बाहर जाना पडेगा. " तेव्हा हरीदादा उत्तर देतो, " इतनी गोलियां है हमारे पास? "या विधानाने प्रेक्षकही संतापतो . आणि सामान्य माणसाला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन समजणारी ही प्रवृति तिथच ठेचुन काढावी अस वाटतं.  पुन्हा दोन्हीमध्ये संघर्ष होत राहतो. दरम्यान यामध्ये कालाला आपला मुलगा व बायको गमवावी लागते. हा वार ही तो नायक म्हणुन झेलतो, सहन करतो. व मी अजुनही हरलो नाही हे सांगायला हरीदादाच्या घरी जातो. तेव्हा या दोन दिग्गज कलाकाराधले संवाद खुप पाहण्याजोगे आहेत. वातारणातला स्फोटकपणा, आणि दोन्ही नायक खलनायक आमने सामने असताना येणार अवघडलेपण काहीतरी अघटीत घडेल या कल्पनेन प्रेक्षकांत मनही साशंक होत. यादरम्यान कालाचा अपमान करण्याच्या हेतुने हरीदादा म्हणतो, " कैसा नाम है रे?  काला, नामसेही घीन आती है ." तेव्हा रंगावरून माणसाची किंमत करण्याची वर्णवादी, माणसाची आदिम अशी विकृत प्रवृत्ति खलनायकीच असल्याच चित्रपटात चितारल गेलय. तेव्हा काला उत्तरतो, '"काला यानी शुभ, सफेद ही पवित्र है ये क्युं कहे? " यामधुन रजनीकांत या वर्णवर्चस्ववादी संस्कृतीची हजारो वर्षाची मांडणी उभी आडवी छेदतो. व काळा रंग हा अशुभ नसुन तोच पांढर्याच्या विरूद्ध शुभही असु शकतो. तो आहे. अशी पर्यायी मांडणी पण करतो. अश्याप्रकारे हा चित्रपट चालत राहतो. कालाच पुढ काय होत हे सांगुन मी तुमचा सस्पेंस मारणार नाही. मात्र 100 वर्षाच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात साम्यवादी, वर्ण ,वंशभेदाच्या विरूद्ध असणार्या मानवी मुल्यांची पेरणी करत समाजातील गरीब, काळा, शोषितांच्या बाजुने लढणारा हाच खरा नायक असतो. हे अधोरेखीत करणारा काला. प्रत्येकानी पहावा असाच आहे.
                    Writtin by - Vikrant Shanke

Comments

  1. कृपया प्रतिक्रिया द्या

    ReplyDelete

Post a Comment