लमाण्याचं भुत ( ग्रामीण कथा )

        लमाण्याचं भुत 
                      
              - विक्रांत शंके

( राजर्षी शाहु महाविद्यालय  (स्वायत्त) पुरस्कृत स्व. भुदेव पाटील उत्कृष्ट लेखक पुरस्कार प्राप्त कथा )


रात्र बरीच झाली होती. जेवणवेळ तर केव्हाच टळुन गेलेली. पण सदुच्या घरात मात्र लगबग चालु होती. " अग ए , माझी बैटरी कुठाय ? अन् भाकरी बांधल्यास का ? चल आटप लवकर लय उशीर झालाय ," इतक्यात बापु आलाच आणि म्हणाला ,  “आरं सदा लवकर नीघ बाबा. का  घराचीच जागल करायची हाय का तुला ?” 
 “ झाल झाल चल” असं म्हणुन दोघ बिगी बिगी शेताकडं जावु लागले. एव्हाना ओढा पार करून ते पोचले देखील. आजुबाजुला टिपुर चांदण पडलेलं. बापुन लगबगीन घोंगड अंथरल. सदा न बापु टेकले. सदाने कमरेची तंबाकु सोडुन दोघांसाठीही  मळली व बापुला दिली. आता तंबाखु चघळत चघळत दोघे गप्पा मारू लागले. सदा म्हणाला, “ बापु लमाण्याचं भुत लय वंगाळ असतया मण आने आस ऐकीव हाय की ह्या शिवारात लमाण्याच भूत वास करतय” बापुच्या मनात सदुने भीतीचं बीज पेरलं होतं. बापु  तरीही बापु लटक्या धाडसाने म्हणला " आसल की घावलं असल, पर पाप्याला. जी लोकं आयुष्यात पाप करत्यात त्येला तरास देत आसल. आपण भेयाचं काम नायं, बर तो कुंभार  आळीतला किशा  बाजाराच्या दिवशीच खुन पाडुन फरार हाय मन " असं सांगुन बापुने भुताचा विषय दुसरीकडे वळवला. मात्र दोघांच्याही सुप्तमनात (Subconscious Mind)  ही गोष्ट दडुन बसली होती. त्या शेतात 20 -25 वर्षापुर्वी लमाण्याचे लोक वस्तीसाठी यायचे व त्या परिसराला तांडाच बनवुन टाकायचे. या दरम्यान त्यातील दोन म्हातारा म्हातारी व त्यांचा तरूण मुलगा काहीश्या कारणाने मरण पावले. त्यांचे अंत्यविधीही जवळपासच करण्यात आला. आता त्यांच भुत अजुन त्या परिसरात वास करत असल्याची खबर सार्या पंचक्रोशित धुमाकुळ घालत होती. सदु आणि बापु ही पार्श्वभुमी विसरून बराच वेळ जागल करून झोपी गेले.मध्यान्यरात्र उलटुन गेल्यावर अचानक सदुला जाग आली. ती काहीश्या विचित्र आवाजानेच. सदा ओरडला " आरं बापु अरं उठ लेका बग ते काय हायं?  बापुही दचकुन उठला. तो काळोखाला भेदत जाणारा भेसुर आवाज हाकेच्या अंतरावरून येत होता.दोघंही जाम घाबरले. थरथरत बापु म्हणाला " सदा, म्या अंड खावुन आलोय. आता लमाणीन काय आपल्याला सोडत नाही. " हे ऐकुन सदाची तर आधीच बोबडी वळली होती. " बापु, घरी चल" एवढेच दोन चार शब्द पुटपुटुन घोंगड तिथच टाकुन ते पळायला लागते.ते पुढेपुढेच जात होते. पण सारख्या अंतरावरून तो आवाज येतच होता. ओढ्यात सुद्धा पाण्यामध्ये चप चप असा कुणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धावत पडत अडखळत अखेर कसातरी गाव आला. दोघंही सदुच्या घरात घुसले व दार लावुन देव्हार्यासमोर वाकळ पांघरून बसले. तोच बापुने देव्हार्यासमोरची टाळ उचलली व राम राम जय हनुमानचा गजर लावला. तोच घराच्या छपरावर खड खड अशी अलगद पडणारी पावले वाजली. आणि  काळजात धडकी भरवणारा उँ...... असा भेसूर आवाज कानी पडला. आता मात्र दोघांची पाचावर धारण बसली. आणि त्यांनी अतीव भीतीने तोंडावर पांघरून घेतलं व निपचित पडुन राहिले. भीतीच्या या गर्द छायेत केव्हा झोप लागली हे त्यांनाही समजलं नाही. सकाळी उन्हं तोंडावर आल्यावर बायकोनी उठवलं तेव्हा त्यांना समजल की आपण माणसाच्या जगात आहोत. 

लमाण्याचं भुत सदाच्या घरापर्यंत आलं होत. ही बाब वार्यासारखी गावभर पसरली.सकाळी  न्याहारीच्या वक्तालाच सदुच्या घरासमोर अख्ख गाव लोटलं. भुताबाबत आधीच आंबटशौकीन असलेल्या या गावातील कुटाळखोर लोकांना एक आयताच विषय चघळायला मिळाला होता. अंगणात लिंबाच्या झाडाखाली सदा व बापु बाजेवर बसले होते. त्यांच्या चहुबाजुला माणसांचा गराडा पडला होता. रात्रीच्या अंगाला शहारे आणणार्या प्रसंगातुन ते पुरते सावरले नव्हते. तोच ते आजुबाजुचे भुतासारखे चेहरे आणि त्यांच्या तोंडुन पडणारे चमत्कारी, प्रश्नरूपी आवाज ऐकुन त्यांना गांगरल्यासारखं झालं. इतक्यात बलराम पैलवान म्हणाला. " बापु... आरं ते बिदीशी भुत.. घरापातुर येईपतूर बसलास , मला हाक दिली असतीस तर त्याच मुंडकच पिरगाळलं असत म्या." असं म्हणुन समोर बसलेल्या रामा लव्हाराचं मुंडक त्याने दोन्ही हातात धरताच भुतानच जणु ते धरल्यासारख किंचाळत तो दूर जावुन बसला. आणि लांबुन म्हणतो कसा ? " बलुदा, तु आसशील पईलवान, पर माझ्यासंग अशी गंमत पुन्यांदा नगु हां., आरं  जीव जायचा एकांद्याचा." 

सर्वजण या प्रसंग विनोदावर आपली हास्यकसरत करू लागले. तेवढ्यात माधव पाटील सगळ्यांना शांत करत बोलले " आरं  गपा रं , हिथं काय चालु ते बगायचं का उग आपलं कुठबी खी.. खी.. खी.. , सांग सदा रातच्याला काय झालं  ते " पाटलांच्या या दरडावणीवर सर्व शांत बसले. व सदाने रात्रीचा प्रसंग तपशीलवार सांगितला. मग हळुहळु वाद विवादाला सुरूवात झाली. नामा कैकाडी म्हणाला , " पाटील ते भुत लय वंगाळ हाय, वढा बी वलांडु देत नाय. मुंडीच मुरगाळुन टाकतया बगा " तर बळी सोनार म्हणाला " पाटील, मला पक्क माहीत हाय. लमाण्याच्या शिवारातलं भुत आन् गांजर्या पिंपळावरचं भूत हे भावकीच हाय बर दोघं बी लईच खतरनाक ." "
".हे सगळ खरं,  पर बंदुबस्त कसा करावा ह्या भूतांचा." एका महत्वाच्या प्रश्नाला हात घातल्यासारखा सूर काढुन राजारामने पुष्टी जोडली.  " आरं , कायको टेंशन लेता है , हमारे पासका बकरा घेवुन जाव , और देव उसको , चुप बैठता है की नय देखो ." असा धंदेवाईक दृष्टिकोन समोर ठेवत रहीम मुसलमानाने यावर फक्कड इलाज सांगितला. इतका वेळ शांतपणे त्यांच बोलण ऐकत असलेला गोरोबा मामा म्हणाला. " आरं , गड्यानु मर्दासारखी मर्द तुमी आन् कुठ भुता खेताला घाबरायलाव हुई रं " गोरोबा मामा शहाणा समंजस व विचारी तसेच कष्टाळु म्हणुन गावाला सर्वपरिचित होता. अंगात दहा हत्तींच बळ होत.पण त्याने त्याचा कधीच गर्व केला नाही. त्यामुळे त्याच्या शब्दाला मान होता. तोच बापु कालचा प्रसंग आठवुन म्हणाला ,  "  काल असायला पायजी होतं तुमी आमच्यासंग , आवं जीव वाचला आमचं पुण्य म्हणायचं " " आरं बापु भुतकेत काय नसत्यात रं,  इतर प्राणायावाणी आपुनबी प्राणीच की , जीव गेला की हव्यात हवा आन् मातीत माती निसिन जायची." अतिशय गावंढळ भाषेत गोरोबा मामानी वैज्ञानिक कारण सांगितल. पण गावकर्यांच्या मेंदुची कवाड गंजलेली असल्यानं त्यांनी आपलाच धोशा लावला. इतक्यात नामा परीट म्हणाला " ते कायबी आसंल आपुन प्राणी असु वा पक्षी , त्ये भुताचा बंदोबस्त कसा करायचा  ते सांगा." यावर गोरोबा थोडं हसला आणि म्हणाला ".मला आज रातच्याला जावुन हे सदुचं भुत बगु द्या अगुदर मग ठरवु काय ते " सर्वांना ही कल्पना पसंत पडली व इतका वेळ सदुच्या घरचा पाहुणचार झोडणारे गावकरी गोरोबा मामा सदुचं भुत बघायला आज रात्री जाणार. ही पक्की खबर घेवुन घराकडं चालते झाले.

उन्हं कलली. सुर्य मावळला हळुहळु रात्रही झाली. गोरोबाने इतक्यात आवरा आवर केली होती. डोक्याला तांबडा पटका. हातात काठी , खांद्यावर घोंगड, पायात जोडा व मिशा. मिशाला पीळ भरीत सहा फुट उंचीचा व भारदस्त शरीरयष्टीचा हा रांगडा शेतकरी झपाझप पावलं टाकीत लमाण्याच्या शिवाराकडं निघाला. ओढा ओलांडुन तो शिवारात आला. घोंगड अंथरून चिलीम पेटवली व आरामात दोन तीन झुरके घेत निवांत निरभ्र आकाशाखाली पहुडला.काही वेळाने त्याला शिवारातील  थंडगार हवेच्या झोताने सुखावुन जावुन डोळा लागला.  मध्यानरात्र झाली असेल,  बाजुला काहीतरी हालचाल जाणवली गोरोबाची झोप चाळवली.त्याने कान टवकारले तर सदुने वर्णन केलेला तोच विचित्र आवाज येवु लागला . उँss... गोराबा म्हणाला " च्या बायला  ! खरचं लमाण्याचं भुत हाय का काय ?" पण गडी धीराचा होता. अलगद घोंगडे उचलुन त्याने खांद्यावर घेतले व चिलीम विझवुन काठी परजित झपाझप चालत त्या आवाजाचा पाठलाग करू लागला. सदुने वर्णन केल्याप्रमाणे ओढ्याच्या पात्रात चपाचप पावले वाजली. आता गोरोबा त्या आवाजाचा पाठलाग करू लागला.  तो आवाज आता गावरस्त्याकडुन न येता. गांजुर्या पिंपळाकडुन येवु लागला. गांजुर्या पिंपळ हा कितीतरी दशकापुर्वीचा भलामोठा वृक्ष. त्यांचा बुंधा कमीत 20 -25  फुटांचा होता. प्रत्येक मोठ्या झाडावर भुत वस्ती करत असतात अशी लोकांची धारणा असते अगदी   त्याचप्रमाणे या गांजुर्यावरही भुतांनी आपली भुतवाडी सजवली असल्याच्या खबरी आजुबाजुच्या गावामधुन उठायच्या. तो आवाज पिंपळवृक्षापाशी जाताच बंद झाला. गोरोबा काहीसा थबकला व काठी परजित सावध पवित्रा घेत पुढे पुढे सरकु लागला. इतक्यात वार्याची एक मोठी झुळुक आली व गोरोबाला कुणीतरी पाठीवर थाप मारल्याचा भास झाला. पण भासच तो इकडे मात्र पिंपळाच्या वाळलेल्या पानांची सळसळ झाली. आणि तसाच आवाज काढीत सावज गावाकडं धावु लागलं. आता मात्र गोरोबाने हयगय करून उपयोग नव्हता. त्याला त्या चंद्रप्रकाशात करड्या रंगाच काहीतरी धावत असल्याचं दिसलं आणि त्याने जवळचाच एक जड गोटा उचलला. आणि नेम धरून सावजाच्या दिशेनी भिरकावला. गोरोबाचा नेम अचुक होता. व्हैक असा आवाज काढुन सावज जागीचं ठार झालं. जवळ जावुन पाहिलं तर सदुचं कुत्रच रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. त्याचा तो निष्प्राण देह पाहुन गोरोबा हळहळला. त्याला सदु बापुच्या भित्र्या मनाची कीव आली, अंधश्रद्धाळु मानसिकतेचा राग आला.त्या कुत्र्याची योग्य ती विल्हेवाट लावुन तो परत मुळ जागेवर येवुन पहुडला. दुसर्या दिवशी सकाळी काहीचं न घडल्याचं सांगुन गोरोबा गावकर्यांसमोर हजर झाला. गोरोबाला जशास तसा पाहुन सर्वांची खात्री पटली की लमाण्याचं भुत बित काही नाही. पण सदु आणि बापु मात्र जरा साशंकच होते. त्यांची ही चलबिचल ओळखुन गोरोबा खाजगी सुरात म्हणाला " आरं सदु ते बघ लमाण्याचं भुत " असं म्हणुन धावत जाणार्या एका कारवानी कुत्र्याकडं बोट केलं .या दिलखुलास विनोदाने सदु बापुसहित सारा गाव हसता झाला..

पुर्वप्रसिद्धी -  वार्षिक  शब्दगंध 2019 

Comments

  1. my short story . Guys please comment

    ReplyDelete
  2. Very nice vikrrant bhai all carectes are interesting🤗🤗 excellent writing 👍

    ReplyDelete
  3. खूप छान एकदम वास्तविक वाटत होत वाचताना आपला समाज किती अंधश्रद्धाळू आहे यांचे खूप छान वर्णन केलय तुम्ही विक्रांत लिहीत रहा असच......

    ReplyDelete
  4. अतिशय उत्कृष्ट लिखान..... वाचकास कथा साक्षात डोळ्यासमेर दिसते.....कथेला अव्वल पारितोषिक यातच सर्वकाही..... लिहीत रहा सरजी

    ReplyDelete
  5. विक्रांत कथा दोन वेळा वाचली .छान आहे .मांडणी चांगली आहे. कथेची मध्यवर्ती कल्पना चांगली आहे. असेच लिहीत राहा.अभिनंदन.

    ReplyDelete
  6. मनः पुर्वक धन्यवाद सर्वांचे. 🙏🙏 keep reading . keep supporting

    ReplyDelete
  7. Exclent thinking also writing

    ReplyDelete
  8. दुनियाँ में दो तरह के लोग होते है एक वो जो दुनियाँ के अनुसार खुद को बदल लेते है और दूसरे वो जो खुद के अनुसार दुनियाँ को बदल देते है।”

    U one of them vikant😊😊😊🙏

    ReplyDelete
  9. खुप छान, अशाच प्रकारे आपले लिखाण वृध्दिंगत होवो

    ReplyDelete
  10. खुप प्रभावशाली विक्रांत भाऊ. आपल्या शब्द गंधाची प्रखड मांडणी केली आहे

    ReplyDelete

Post a Comment