मनाई हुकुम ( दीर्घकथा )
. Adv. श्रीकांत द्रवीड माझा एम ए चा वर्गमित्र. त्याकाळात शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आजच्यासारखी Entrance वगैरे नव्हती. तेव्हा आजसारखा 10 +2 चा पैटर्नही नव्हता. ग्रैज्युएशन करायचं असेल तर PUC ( Pre University Exam) द्यावी लागायची. आणि ही पी यु सी देवुन पदवीला आलेली आमची शेवटची बैच. आणि श्रीकांत मला भेटला एम ए समाजशास्त्रला. आम्हां सगळ्या क्लासमेट्समध्ये श्रीकांत एक वेगळाच मुलगा होता. तो हुशार तर होता पण त्याच वाचनही अफाट होतं, विविध सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय असायचा. त्याच्या व्यक्तीमत्वाला एक विद्रोहीपणाची किनार होती. हळुहळु या किनारीचा पदर झाला. ती बाब अलाहिदा. सतत समाजबदलाची, परिवर्तनाची भाषा करणारा आणि समाजातील उपेक्षित समुहाबद्दल मोठी आस्था बाळगणारा हा तरूण माझा जीवलग होता.
त्यादिवशी आम्ही कॉलेज कैन्टीनमध्ये गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी आमच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव द्यावं म्हणुन दलित समाज खुपच आग्रही आणि आक्रमक होता. आज यावरच चर्चा रंगली होती.
मी म्हणालो " श्रीकांत , यार बाबासाहेबांना आपण थोडंफार तरी वाचलय , विचार कर हे सगळ बाबांना अपेक्षित होतं का रे ? " श्रीकांतने कॉफी मागवली होती. पोर्याने काचेचे ग्लास टेबलवर ठेवले. त्यातील एक ग्लास स्वतःकडं घेत तो म्हणाला , " हे सगळ म्हणजे ? " " अरे सगळ म्हणजे , बाबांच नाव विद्यापीठाला द्यावं वगैरे " श्रीकांतने शांतपणे कॉफी प्यायला सुरूवात केली. मी पुढं म्हणालो , " तसा माझा याला पाठिंबाच आहे , आणि मला माहितीय आपण एका संवेदनशील विषयावर बोलतोय " श्रीकांतचा शांतपणा मला अस्वस्थ करून जात होता. त्याने पुढ्यातली कॉफी संपवली आणि खुर्ची थोडीसी पुढे ओढुन म्हणाला , " राम , तु बोलतोयस ते योग्यच आहे . या गोष्टींची चिकित्सा व्हायलाच हवी, नाहीतर आपल्या चुका कश्या समजणार ? खचितच बाबांना हे आवडल नसतं .नावासाठी काम करणारे बाबासाहेब कधीच नव्हते. पण लक्षात घे ही चळवळ केवळ नामाग्रहाची चळवळ नाहीचये. ही चळवळ सवर्णांच्या मानसिकतेविरुद्धची लढाई आहे. अरे , देशाला स्वातंत्र्य मिळुन आज 40 -45 वर्ष होताहेत. संविधान अंमलात येवुनही तेवढाच काळ लोटला. पण हे लोकं काही बदलायला तयारचं नाहीत. एवढ्या महान माणसाला आजही हे जातीच्या चष्म्यातुन पाहताहेत . " आणि मग तो जात-जाणीवा , समुहचेतना, भारतीय समाज,आंबेडकरांचा दृष्टिकोण यावर तास दीड तास पोटतिडकीने बोलत होता.
त्याच दांडग वाचन .प्रत्येकाला समजुन घेण्याची धडपड.चळवळ्या स्वभाव यामुळं आम्हां सर्वांना तो जाम आवडायचा. त्या घटनेनंतर दिवसा मागुन दिवस गेले. एव्हाना आमचं MA पुर्ण झाल होतं. विद्यापीठाला बाबासाहेबांच नाव देण्याची दलित समाजाची मागणीही काही अटी व शर्तीवर पुर्ण झाली.पण त्यासाठी त्याना जबर किंमत मोजावी लागली. प्रसंगी आपल्या प्राणांच मोल चुकवुन भुमिकेशी एकनिष्ठ राहणार्या या लढवय्या समुहाचा मी मोठा चाहता झालो होतो.
वर्षामागुन वर्ष उलटली . पुढं मी समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणुन नागपुरच्या एका महाविद्यालयात रूजु झालो. श्रीकांत वकील झाला होता. नोकरीमुळे मला बर्यापैकी स्थैर्य आल होत.तरीही मी माझा वेळ वाचनात वगैरै जास्त घालवत नव्हतो. मला आवड नव्हती. पण अधुनमधुन कधी श्रीकांतकड गेलो की , तो मात्र सतत काहीतरी नवीन वाचलेल सांगत असायचा. वैचारिक बाजुनी तो समृद्ध होता . पण श्रीकांतची भौतिक परिस्थिती काही सुधारली नव्हती. त्याची प्रैक्टिस जोरात चालु होती , पण त्याच्याकड येणारा माणसांचा लोंढा मुळात कष्टकरी , मजुर , व उपेक्षित वर्गातुन येत असल्याने त्याना मिळवुन दिलेल्या न्यायाच्या बदल्यात श्रीकांतला घसघसीत आर्थिक मोबदला मिळण्याऐवजी समाजसेवेचं समाधान तेवढच मिळायचं. अत्यंत अडचणीच्या वेळी जवळचा मित्र म्हणुन मला तो हजार - पाचशे मागायचा. मला पैसे मागायचा मात्र पैशासाठी त्याने स्व: चा स्वाभिमान कुठे विकला नाही किंवा सामान्यांच्या न्यायाचा कोण्या बड्या पार्टीशी सौदाही केला नाही. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात तो नेहमीच कायद्याची मुठ उगारून उभा राहिलेला असायचा.
माझ्या नोकरीवर रूजु होण्याला 15 वर्ष उलटुन गेली होती. पगारातला पैसा साठवुन मी शेती घेतली होती . आता त्याची रजिस्ट्री व इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी मला श्रीकांतकडे जायचं होतं. त्या दिवशी सगळे कागदपत्र घेवुन मी श्रीकांतच्या घरी गेलो. कोर्टाहुन आल्यानंतर तो आपल्या घरासमोरच्या अंगणात खुर्ची टाकुन वाचत बसलेला असायचा. आजही तसाच बसला होता. मला पाहताच तो हसतमुखाने उठला , आणि मोठ्या आवाजात त्याने माझ स्वागत केलं. " अरे ये राम वेलकम " हातात हात गुंफुन आम्ही खुर्च्यापर्यंत गेलो. बसलो. श्रीकांतने त्याच्या मुलाला बोलावुन सरबत आणण्यास सांगितल .
" मला समजलं तु नागपुरहुन आलायस ते "श्रीकांत म्हणाला. " तुला कसं काय समजलं? " " अरे कोर्टात तुझा लहान भाऊ आला होता ,त्याने सांगितलं ." हो का ? , खरतर मी दोन दिवसापुर्वीच आलो होतो. पण थोडं निवांत झाल्यावर तुला भेटायला यावं म्हणल ." " काही हरकत नाही राम . कधीही माझ्या घराचं दार तुझ्यासाठी नेहमी खुलच आहे. " हे बोलताना त्याच्या डोळ्यातला मैत्रीभाव मला स्पष्ट जाणवत होता. एव्हाना सरबतही आलं . सरबत घेत घेत आमच्या गप्पा चालल्या होत्या .
तेवढ्यात एका माणसाचा आवाज आला. " वकीलसाहेब ....हायीत का ? " आम्ही दोघांनी त्या व्यक्तीकडं पाहिल.साध्या कपड्याची शिवलेली शर्ट -पैंट , हातात लाल रंगाची पिशवी. पायात हलक्या प्रतीची स्लीपर चप्पल. अश्या अवतारात तो गेट बाहेर उभा होता. सोबत त्याची बायको व लहान मुलं. या चौघांच्याही चेहर्यावर कसलीच कळा नव्हती. श्रीकांतने त्यांना आत बोलावलं. चटई मागवली. आम्ही सर्वजण आता चटईवर बसलो.
" बोला. काय काम आहे ?" श्रीकांतने प्रश्न केला. तेव्हा त्या माणसाने सांगण्यास सुरूवात केली.
" सायेब मी रमेश गायकवाड.सोनटाकळी गावचा हाय. तीन वर्षापुर्वी पोटापाण्यासाठी शहरात आलो. उगं मोलमजुरी करून खायचो. आडतीवर हमाली करायचो. एके दिवशी काम करताना पोत्याची थप्पी अंगावर पडली. बेहोस झाल्तो. मालकानं सरकारी दवाखान्यात आडमिट केलं. 12 -20 दिवसान सुट्टी मिळाली. पर पुना कोणत वझ उचलालयला मनाई केलीय. भकाळीला इजा हाय मण. आता हमालीच काम बी गेल.मालक भला व्हता. त्येनच मला बिनव्याजी 15 हजार रूपय दिलं. त्या पैशान मी नेहरू चौकात भज्याचा गाडा लावला. हळुहळु चांगलाच जम बसला. आज दोन अडीच वरीस झालं लेकरू बायकु घेवुन सुकान खात व्हतो. पर सुकाची भाकर गरीबाला कुठली. मी ज्या बंगल्या समोर माजा गाडा लावलाय तो बंगला एका मोठ्या वकीलसायबान घेतलाय. त्या दिवशी ते सायेब मला बोलले.
"ये काय नाव तुझं ? " " रमेश हाय सायेब " " हे बघ रमेश . मी Adv. रमाकांत डांगळे. जिल्हा सरकारी वकील म्हणुन काम पाहतो. हा बंगला मी घेतलाय. लवकरच माझ कुटुंब इथे रहायला येणार आहे. या तुझ्या गाड्यामुळं माझ्या बंगल्याची शोभा चाललीय सगळी. तेव्हा दोन दिवसात तु हे सगळं घेवुन पुढच्या चौकात जा किंवा कुठेही जा. पण इथं नको." " माज्या डोळ्यात खळकन पाणी आलं सायेब . कुठ जाणार मी ? "
"पुढ काय झालं ? त्या वकीलांनी हाकलल तुला म्हणुन इकडे आलास ? " मी अगतिकतेने प्रश्न केला. " च् राम , तो सांगेल न " श्रीकांत नापसंतीनेच म्हणाला. रमेश माज्याकडं वळुन मला म्हणाला , " थोडाफार कायदा मलाबी कळतुया सायेब. त्येनी मला मला हाकलल असत न्हायतर लोक लावुन मारल आसतं तर म्या पोलिसांत तक्रार केली अासती. पण ते पक्के कायद्याचे माणस हायेत. त्येनी स्वतः लक्ष घालुन नगरपालिकेला पत्र लिहुन सांगितलय की हे अतिक्रमण हाय ते हटवा. आज ते लोक आले व्हते. आज सगळच उचलुन फेकणार पर म्या हातापाया पडुन उद्या 5 पर्यंतचा येळ मागितला."
" आणि , तडक इकडे आलास वा छान !" मी हसुन सिगरेट सुलगावली. एखाद्या बावळटाकडं पाहतात तस माझ्याकडं पाहुन रमेश म्हणाला . " न्हाई सायेब. आदी मी माज्या चाळीतल्या वकीलाकडं गेल्तो. डांगळे वकीलाचं नाव ऐकल्यावर तो उडालाच. म्हणाला " " हे बघा रमेशभाऊ . Adv. रमाकांत डांगळे. ही शहरातली मोठी आसामी आहे. त्यात ते आमचे सिनीयर . त्यांच्या घरी कायदा पाणी भरतो. त्यांच्यासमोर तुमचा निभाव लागणं शक्य नाही भाऊ . तुम्ही दुसरा पर्याय बघा . अहो कोर्टात तुमचा दावा दाखल होणं तर दुरच पण तुम्हांला डांगळे साहेबांच्या विरोधात कुणी वकील मिळतो का ते पहा आधी ." " मी डोस्क्यावर हात मारून घेतला सायेब. तवा आमच्या चाळीतल्याच एका कार्यकर्त्याने तुमचं नाव सांगितल म्हणले " " आज तुझ्या बाजुने जर,कोण उभा राहिल तर ते फक्त Adv. श्रीकांत द्रवीड. " " म्हुन मी तुमच्याकड आलो सायेब . माझ घर वाचवा ."
इतका वेळ मान ताठ करून ऐकत असलेला श्रीकांत जरासा Relax झाला. त्याने वहिनीला पोहे तयार करण्यास सांगितल . आमच्याकडं वळुन म्हणाला " मला सांगा रमेश ही जागा सगळी न पा च्याच मालकीची आहे का ? फुटपाथवर वगैरे गाडा लावलाय का ? " " न्हाई सायेब 4 फुट जागा बाजार समितीची हाय , उरल्याली दोन फुट नगरपालिकेची . पर म्या नगरपालिकेचं चलन काटतु वर्साला . त्येचं हे कागद आणलेत ". श्रीकांतने कागद चाळले.
" कृषी उत्पन्न बाजार समितीचे ना हरकत प्रमाणपत्र, ....नगरपालिका टैक्स पावत्या... शॉप एक्टचं प्रमाणपत्र... अरे वा ! रमेश तुझ्याकडं लायसन्सही आहे. हे सांगितलं नाही. एवढे पुरावे पुरेसे आहेत. तुला मनाई हुकुम मिळायला.उद्या आपण नगरपालिकेच्या विरोधात दावा दाखल करू व तुला मनाई हुकुम मिळतो का ते बघु."
" हे मनाई हुकुम काय आसतो सायेब ?
" अरे मनाई हुकुम म्हणजे इंग्रजीत याला Stay order म्हणतात. जेव्हा एखाद्या स्थावर मालमत्तेवर दोन्ही बाजुनी हक्क सांगितला जातो तेव्हा न्यायालय ती जागा कुणाची हे पुराव्यानिशी सिद्ध होईपर्यंत आहे त्या स्थितीत सगळं ठेवण्याचे आदेश देतं." " म्हजी सायेब , माजं दुकान राहणार ना तितच.
" हो हो राहील आता तु उद्या 11 वाजता कोर्टात ये ." हे ऐकुन रमेशच्या चेहर्यावर अंधुकस का होईना हसु उमटलं. तो चाचरत म्हणाला " सायेब तुमची फीस न कागदाचा खर्च मिळुन पयस किती लागतील ? " श्रीकांत हसुन म्हणाला " तुर्तास कागदपत्रांचाच तेवढा खर्च दे. पाचशे रूपये पुरतील . उद्या कोर्टात घेवुन ये ." रमेश नमस्कार करून निघुन गेला.
माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांच काहुर माजलं होतं. मला कायदा समजत नाही मात्र या माणसाला काही झालं तरी न्याय मिळावा असं मनोमन वाटत होतं.
" आता काय करणार श्रीकांत ?" मी काळजीने विचारलं " हे बघ राम . रमेशकडे असलेल्या पुराव्यावरून ती पुर्ण जागा काही नगरपालिकेच्या मालकीची नाही. अर्धी जागा ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. आता रमेशचा थोडा पसारा रोडवर असेलही या कारणावरून त्याचा संपुर्ण गाडा अतिक्रमण ठरवुन उद्या त्याला काढुन टाकायचा डाव डांगळे साहेबांनी खेळलाय. अरे , आपल्या बंगल्याची शोभा जाते म्हणुन एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करणार तुम्ही ?? बोल राम , तुझा ओशो यावर काय सांगतो. ओशोना भरपुर ऐकतोस न जरा मार्क्सही वाचुन पहा. " त्या रात्री मला झोप आली नाही. उद्या रमेशचं काय होणार या विचारानी मला पछाडलं होतं .
दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजता मी श्रीकांतच्या घरीे गेलो. तो ही निघण्याच्या तयारीत होता. तो पांढर बैंडेज गळ्याला बांधत कोट चढवत हॉलमध्ये आला. मला पाहुन म्हणाला " सॉरी राम , आज तुझं रजिस्ट्रीचं काम होणार नाही. मला रमेशचा प्रकरणात दावा दाखल करायचाय. हवं तर तु उद्या ये." मी म्हणालो " माहितीय रे , पण मला आज तुझ्यासोबत कोर्टात यायचयं " श्रीकांत बुट चढवत होता. त्याने चमकुन वर पाहिलं.
" असं म्हणतोस बरं चलं " दोघही बाहेर पडलो. श्रीकांत त्याच्या स्कुटरकडे जात होता. मी म्हणलं " आज कारने जावुया माझ्या " दोघंही गाडीत बसलो . तेव्हा माझ्याकडं व्हाईट कलरची टाटा इंडिगो होती. श्रीकांतच घर ते कोर्ट 20 मिनीटांचा रस्ता होता. त्यात 3 -4 सिग्नल्स व काही वळणं.
आम्ही कोर्टाच्या आवारात पोचलो. मी गाडी पार्क केली. जिल्हा व सत्र न्यायालय असं त्या इमारतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. तिथल्या एका लिंबाच्या झाडाखाली रमेश व त्याची बायको उभे होते. आम्हांला पाहुन ते जवळ आले. श्रीकांत म्हणाला
" दुपारी दोन वाजेनंतर मी तुम्हांला बोलावीन तेव्हा या " रमेशच्या मनात धाकधुक होती. आणि तो बराच साशंकही वाटत होता. त्याला धीर देण्यासाठी मी म्हणालो ".काळजी नका करू . तुम्हांला आज मनाई हुकुम मिळेलच ." जाताना श्रीकांत माझ्यावर जाम उखडला . " राम . तुला मनाई हुकुम मिळणं सोप वाटतं का रे ? "
" अरे , तुला कोण नाही देणार मनाई हुकुम ?? " मी हसुन म्हणालो .
" राम अरे घरच्यासारखा कारभार नाही चालत इथे. न्यायालय आहे हे. या प्रकरणात मोठी रिस्क आहे. आपण दावा दाखल करायला चाललो आहोत हे खरयं. पण कोर्टाने मनाई हुकुमाऐवजी Show cause ची ऑर्डर केली तर अवघड आहे. बहुतांशी प्रकरणात हेच होतं . कोर्ट कुणालाच एका बाजुने मनाई हुकुम ( x Party injection ) देत नाही. " हे ऐकुन मी थोडासा गोंधळात पडलो .
" ही Show cause ची ऑर्डर म्हणजे काय असतं ? " श्रीकांतला प्रश्न केला .
" show cause म्हणजे समोरच्या पार्टीला बोलावुन घेणे. त्यांच म्हणणं मांडण्याची संधी देणे. आपल्या प्रकरणात असं झालं तर समोरची पार्टी हजर होईपर्यंत वेळ जाणार. नगरपालिका रमेशचा गाडा उचलुन नेणार. पजेशन गेल्यावर काय राहतय भाऊ .."
मी काय ते समजलो. प्रकरण गंभीर दिसत होतं.
आम्ही श्रीकांतच्या टेबलला आलो. कोर्टात वकीलांच्या बार असोसिएशनने प्रत्येक वकीलाला बसण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यात एका कोपर्यात श्रीकांतचा टेबल होता. आम्ही दोघं बसलो. त्याने आपल्या सुटकेसमधुन टाईप केलली काही पानं काढली . आणि माझ्याकडं पाहुन म्हणाला " हे बघ , हा आपला दावा. काल रात्री मी टाईप केला. तुला आता दिवाणी दावा कसा दाखल करतात त्याचं प्रोसिजर सांगतो. याला आता कागदपत्रांची यादी ( List of Document ) जोडायची . म्हणजे या दाव्यासोबत जी कागदपत्रे जोडणार आहोत त्याचं विवरण. आणि आता O.S . कडे जायचंं " टैगची गाठ बांधत तो म्हणाला .
" म्हणजे कुणाकडं "
" कार्यालय अधीक्षक . उठा ! " माझ्या खांद्यावर हलकीशी थाप मारून तडातडा पुढे चालु लागला .
दोन मजले चढुन एक वळण घेतल्यावर एका ऑफिसमध्ये आम्ही गेलो. एका टेबलवर लाल कपडा अंथरलेला समोर दोन खुर्च्या टाकलेल्या. तिथ जाड भिंगाचा चष्मा घातलेला एक माणुस फायली उघडुन बसला होता. बहुधा तोच OSअसावा.
आमची चाहुल लागताच त्याने वर मान करून पाहिलं. श्रीकांतकडे पाहुन स्मितहास्य केलं नी म्हणाला.
" नमस्कार वकीलसाहेब ! काय आणलत ?" " मनाई हुकुमासाठी "
" बर बर"
त्याने ती कागदपत्र घेतली आणि वर पाहुन "कोर्टासमोर असं हसुन सांगितलं " मला अाताही काही समजलं नाही.
" काय न्यायालयात अशी कोडची भाषा चालते वाटतं. दावा तिथे आपण इथे. कोर्टासमोर जायचंय न आपल्याला तर ". मी न्यायालयाच्या त्या कक्षात जायला अगदी अधीर झालो होतो, जो आपण नेहमी सिनेमात पाहतो. " रामभाऊ , जरा धीर धरा. आता यावर RCSN नंबर पडेल म्हणजे Regular civil suit number आणि सिरीयलप्रमाणे दावा कोर्टाकडे पाठवला जाईल . तेव्हा आपण हजर व्हायचं " श्रीकांतने मला समजावलं . आता मात्र मी मौन साधायचं व होईल त्याचा मुक साक्षीदार व्हायचं ठरवलं.
टेबलपाशी आल्यावर श्रीकांत मला म्हणाला " तुला हवं तर इथच बस किंवा बाहेर फिरून ये. मला एका क्रिमीनल मैटरमध्ये अपीअर व्हायचय . दुपारी रमेशच्या प्रकरणात अर्ग्युमेंटच्या वेळी मी बोलावतो तुला . " असं सांगुन तो ताड ताड निघुन गेला.
श्रीकांत गेल्यावर मला कुठल्यातरी गुंगीतुन बाहेर आल्यासारखं वाटलं. आता रमेश प्रकरणाचा विचार सोडुन मी आरामात कोर्टाचं आवार फिरून घेतलं. जिकडे तिकडे वकीलांचीच रेलचेल दिसत होती. बाहेर पोलिस गाड्याही थांबलेल्या . थोडासा बाहेर आलो. सिगरेट शिलगावली . एक दोन तीन पाकीट खाली व्हायला आलं. घड्याळ पाहिलं तर 12 वर काटा . " छे ! आतातर बारा वाजलेत आज वेळ का जात नाही बुवा ? " मी स्वतः शीच बोललो .नागपुरला कॉलेजमध्ये मात्र वेळ कसा गेला ते कळतच नाही. असो ज्याची त्याची कर्मभुमी. अजुन बराच वेळ टाईमपास केला. आणि समोरच्या टपरीवरून एक गार पाण्याची बाटली घेतली. पाणी पिलं आणि गाडीत येवुन झोपलो.
चांगलीच झोप लागली असेल एवढ्यात माझा फोन खणखणला . श्रीकांतचाच होता. " हां बोल , कुठं येवु ? " " माझ्या टेबलजवळच ये . " मी गडबडीने उठलो. डैशबोर्डवरची पाण्याची बाटली घेतली. जरा बाजुला येवुन तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि रूमालाने तोंड पुसून टेबलपाशी गेलो.मला पाहुन श्रीकांत पुढे चालायला लागला होता. त्याच्या मागोमाग जीने चढुन एका पैसजमध्ये गेलो. कोणत्याही सरकारी कार्यालयाबाहेर आधिकार्याच्या नावाची पाटी असते , तशी याही दाराबाहेर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर - वर्ग 2 अशी पाटी होती.
आम्ही कोर्टहॉलमध्ये प्रवेश केला. मी तिथल्या दुसर्या रांगेतल्या खुर्चीवर जावुन शांतपणे बसलो. माझ्या मागच्या रांगेत रमेश व त्याची बायको दोघेजण बसले होते. श्रीकांत तिथल्या कारकुनाशी काहीतरी बोलला . इतक्यात न्यायाधीश आले. सन्मान म्हणुन आम्ही सर्वजणं उठुन उभा राहिल व बसलो. कारकुनाने अदबीने एक फाईल न्यायाधीशासमोर ठेवली. कदाचित तो आमचाच दावा होता. न्यायाधीशानी एक दोन पान चाळली. आणि श्रीकांतकडे पाहुन म्हणाले. " वकीलसाहेब , काय प्रकरण आहे ? त्या आवाजासरशी श्रीकांत उठला. त्याने मागे वळुन संपुर्ण कोर्टहॉलवर नजर टाकली. मग न्यायाधीशांकडे पाहत आपल्या कोटाशी हलकासा चाळा करून किंचितशी मान झुकवली व बोलायला लागला. कॉलेजच्या वेळी वादविवाद स्पर्धांत बोलायचा तसा.
" युवर ऑनर , वादी नामे रमेश गायकवाड. याचा शहरातील नेहरू चौकात भजे न वडापावचा छोटासा व्यवसाय आहे. ज्या जागेवर हा व्यवसाय चालवतो त्या एकुण जागेपैकी 4 फुट जागा ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. आणि नगरपालिकेचा त्या जागेवर काहीही हक्क नसताना काल ......." अशाप्रकारे कालची सगळी हकीकत न्यायाधीशांना सांगत मध्येच एका तामिळ कथेचा संदर्भ देत श्रीकांतने रमेशच्या बाजुने तगडा युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकुन घेतलं. तो अर्ग्युमेंट संपवुन खाली बसला. मी आनंदितिशयाने टाळी वाजवली. आणि कोर्ट हॉलमध्ये टाळ्यांचा एकचं कडकडाट झाला. न्यायालयासमोर अजुनही प्रकरण चालु होती.
श्रीकांत बाहेर आला पाठोपाठ मीही. जीना उतरत असताना माझ्या खांद्यावर हात टाकुन श्रीकांत म्हणाला " राम मित्रा , माझ्या हातात जे काही होतं. त्या माणसाचा संसार वाचवण्यासाठी मला जिकतं करता येत होतं ते मी केलं. पाहुयात पुढ काय होतय ते ." त्याच्या आवाजात हलकासा मृदुपणा जाणवत होता . " ऑर्डर कधी होईल? " " पाच वाजता समजेल." मी घड्याळाकडं पाहिलं. एक तास उरला होता.
टिक .टिक. टिक . पाच वाजले होते. मी आणि श्रीकांत वेगानी कोर्टात गेलो. न्यायाधीश निघुन गेले होते. आम्हांला पाहुन कारकुनाने दोन छापील पान स्टैपल करून आमच्या हातात दिली. ऑर्डर हातात घेवुन श्रीकांतने पहिल्या पानावर ओझरता कटाक्ष टाकला. दुसर्या पानावरच्या उजव्या कोपर्यावर त्याची नजर स्थिरावली. पटकन खिशाची ओळ काढुन त्याने त्यातील एका ओळीला अधोरेखीत केलं व मला वाचायला दिली. " Injection granted till disposal Of the suit." असं लिहिलेलं होतं. श्रीकांतने माझा डावा खांदा ठेवत सांगितलं " राम आपण जिंकलो . आता या केसचा निकाल लागेपर्यंत रमेशला नगरपालिका काय ब्रम्हदेवही हलवु शकणार नाही. " तो जीना उतरत म्हणाला . " आणि केसचा निकाल कधी लागेल "माझा भाबडा प्रश्न
" केसचा निकाल..हा हा तारीख पे तारीख .. हा हा " मी गाडी काढली .
आता श्रीकांत ड्राईव्ह करत होता. आम्ही नेहरू चौकात आलो.तर तिथे नगरपालिकेचा टेम्पो उभा होता व नगरपालिकेचा कर्मचारी निळ्या रंगाची पाण्याची पिंप आतमध्ये टाकत होता. हे पाहण्यासाठी गर्दी जमली होती. गर्दी हटवत आम्ही गाड्याजवळ गेलो. आम्हांला पाहुन रमेश धावत आला. तो ढसाढसा रडत होता.
" वकीलसायेब , ह्या सायबाला सांगा. आमी उघड्यावरच येताव हो " आम्हांला पाहुन कार्यवाही थांबली होती. श्रीकांतने नगरपालिकेच्या आधिकार्याला सर्व हकीकत सांगितली व मनाई हुकुमही दाखवला. पाण्याची पिंप टेम्पोतुन उतरवली गेली. टेम्पो निघुन गेला. गर्दीही पांगली. आम्ही रमेशने दिलेल्या स्टुलवर बसलो. रमेशने चहाही केला. चहा पित असताना मी माझी नजर एका ढेरपोट्या सुखवस्तु दिसणार्या माणसावर गेली. गेंडासिंग सारखा दिसत होता. आणि गैलरीत थांबुन आमच्याकडं घुश्याने पाहत होता. यावेळी श्रीकांतला न विचारता मी ओळखलं. हाच या कथेतला व्हिलन Adv. रमाकांत डांगळे. त्यादिवशी श्रीकांतच्या प्रयत्नाने रमेशचा संसार वाचला होता. आम्ही घरी आलो. श्रीकांतचा निरोप घेताना त्याला कडकडुन मिठी मारली. आज माझ्या मित्र मला डोंगराएवढा वाटत होता. समाजातल्या अन्यायाविरोधात न्यायाची मशाल घेवुन उभा असलेला. आणि हो त्या रात्री मला खुप शांत झोप लागली बरं का .
( समाप्त )
- विक्रांत शंके
संपर्क -9890766640
shankevikrant7@gmailcom


friends my New long sort.plzz read and comment
ReplyDeleteखुप सुंदर लिहिलं आहे सर
ReplyDeleteVery nice 👌👌👌👌👍👍
ReplyDeleteGr8 sir 😃😃😃
ReplyDeleteअप्रतिम लिखाण विक्रांत....
ReplyDeleteVery nice story...