बुलबुल - अस्वस्थ करणारी सर्जनशील कलाकृती
बुलबुल - अस्वस्थ करणारा चित्रपट
अन्नीता दत्त दिग्दर्शित आणि अनुष्का शर्मा निर्मित बुलबुल हा चित्रपट इंडियन सुपरनैच्युरल गॉथिक ड्रामा या जॉनरमधला आहे. ( हा मिक्स जॉनर मीच तयार केलाय 🙈) कारण यामध्ये या सगळ्या थीम आलेल्या आहेत. हल्ली अनेक चित्रपटामधुन नवनवीन मांडणी होताना दिसत आहे. सर्जनाचा हा नवा अवकाश नक्कीच प्रेक्षकांच अनुभविश्व समृद्ध करत आहे. यात शंकाच नाही. आता बुलबुल चित्रपटाबदल बोलत असताना खुप काही नवीन गोष्टी सांगता येतील. सर्वात प्रथम आपण याचा स्टोरी प्लॉट पाहुया.
गोष्ट आहे ब्रिटिशकालीन बंगालमध्ये बड्या घरात घडणारी. सन 1800 चा उत्तरार्ध ते 1900 चा पूर्वार्ध यात दाखवण्यात आला आहे.
कहाणी सुरू होते लग्नघरातुन. सन 1881 5 वर्षाची बालवधु बुलबुल हीचं लग्न ठाकुर इंद्रनील याच्या सोबत झालेल असत. जो तिच्याहुन वयानी खुपच मोठा असतो. पण तिची मैत्री होते लहानग्या 8 वर्षाच्या सत्येंद्र ठाकुरसोबत जो तिला भुतांच्या वगैरै गोष्टी सांगुन रिजवत असतो.बुलबुलला अजुन एक मोठा वेडसर दीर असतो. महेंद्र ठाकुर. हा जयवंत दळवीच्या कादंबरीतल एक पात्र वाटत. लग्न लागुन ती बालवधु घरी येताच हा तिच्या मधुचंद्र शय्येवर जातो तेव्हा इंद्रनीलला हस्तक्षेप करावा लागतो. आता इथुन सिनेमात फ्लैशबैक तंत्र वापरलेलं आहे. वर्ष उलटुन गेलीत आणि सत्येंद्र ठाकुर लंडनगहुन आपलं शिक्षण संपवुन परत आला आहे. तेव्हा तो आपल्या भाभीला (बडी बहु )भेटतो. त्यानंतर त्यांच्यात गप्पा होतात. लहानपणच्या निरागस आठवणीना उजाळा मिळतो. मग दोघे महेंद्रच्या विधवा पत्नीला भेटायला जातात. प्रवासादरम्यान ती खुपच खुष दिसत असते. सत्येंद्र जेव्हा विधवा भावजयीला वेडसर भावाच्या मृत्युबद्दल विचारतो तेव्हा भुतीणीच्या हल्ल्यामुळे त्याच्या मृत्यु झाला हे कारण ती सांगते. कारण त्याच्या मृतदेहाजवळ उलट्या पावलाचे निशाण आढळलेले असतात. सगळ्या गावालाही तसच वाटतं असतं. यावर सत्येंद्र हसतो. दुसर्या दिवशी हा शिकारीला निघालेला असतो तेव्हा बही बहु एका परक्या माणसासोबत त्याच्या मांडीवर दोन्ही पाय ठेवुन बसलेली आढळते. याच्या मनात संशय निर्माण होतो. त्याची ती अवस्था पाहुन बुलबुलच पुढाकार घेवुन सांगते की , हा डॉक्टर सुदीप मी पायर्यावरून पडले व जायबंदी झाले तेव्हापासुन माझी देखभाल करत असतात. सत्येंद्रला मात्र हे काही खर वाटत नाही. बुलबुल डॉक्टरला सत्येंद्रसोबत मृगयेला ( शिकारीला ) जाण्याबाबत सांगते तेव्हा डॉक्टर म्हणतो , " माझ काम जीव वाचवण्याचं आहे , जीव घेण्याचं नाही. " दोघामध्ये पडलेली ही पहिली ठिणगी. त्यानंतर शिकारीदरम्यान सत्येंद्रचा सहकारी मास्टरबाबुचा खुन होतो.तेव्हा भुतीण खुन करत नसुन एखादा सिरीयल किलर या खुनाच्या मागे आहे. असा अंदाज लावुन या खुनाचा तपास सत्येंद्र पोलिसाकडे सोपवतो. व त्यानाही जाबही विचारतो. की तुम्ही कसले पोलिस आहात ? गावात खुनसत्र चालु आहे आणि तुम्ही काय करताय. तेव्हा पोलिस म्हणतो की , तुमचं खरय पण ब्रिटिश कायदा हा पुराव्यांवर विश्वास ठेवतो. तेव्हा सत्येंद्र पुरावा गोळा करायला लावतो. आणि पहिला खुन केव्हा झाला हे विचारल्यावर डॉक्टरांच्या येण्यानंतरच खुनसत्र सुरू झालं. असं त्याला समजतं व सत्येंद्रचा संशय डॉक्टरवर जातो. व त्यादृष्टीनेच हा खुनाचे पुरावे गोळा करायला लागतो.
पण कहाणी काही और असते. वेडसर महेंद्र ठाकुरची पत्नी बुलबुलची भावजय तिचा प्रचंड मत्सर करत असते. यात सत्येंद्र ठाकुर व बुलबुलची मैत्री असते . त्यात तिचं सत्येंद्रवर एकतर्फी प्रेमही असतं. कारण लग्न झाल्यापासुन तोच तिला समजुन घेणारा असतो व तिच भावनिक नात बनलेलं असतं. याची कल्पना सत्येंद्रला नसते. ही बाब बिनोदीनी दिदी इंद्रनीलच्या लक्षात आणुन देते. तेव्हा त्याच्यातला संशयी व पजेसिव पुरूष जागा होतो. ( कमी आधिक प्रमाणात तो सर्वातच असतो. ) तेव्हा इंद्रनील आपल्या लहान भावाला उच्चशिक्षणासाठी लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतो. हा निर्णय ऐकुन बुलबुल खुप अस्वस्थ होते. त्यात ती आपल्या नवर्याला प्रश्न विचारते की , सत्येंद्रला लगेच पाठवणार का ? तेव्हा हा म्हणतो , नाही. 3 महिन्यानंतर मोठा सण आहे तो उरकुन मग पाठवु तुर्तास आम्ही कार्यालयीन कामाच्या पुर्ततेसाठी कोलकत्याला जावुन येतो. ते दोघे कोलकत्याला जातात . इकडे बुलबुलची प्रचंड घालमेल होते. ती किती अगतिकतेने सत्येंद्रची वाट पाहत असते. पण जेव्हा तिचा नवरा एकटाच घरी परततो तेव्हा मात्र हिची घोर निराशा होते. सत्येंद्रचा रस्ता पाहुन हिची खुप वाईट अवस्था झालली असते. शेवटी बुलबुल खुपच दुःखी होते. सत्येंद्रचा विरह तिला सहन होत नाही. लंडनला जायच ठरल्यावर सत्येंद्रने तिला एक डायरी दिलेली असते व त्यात लिहीण्याबद्दल सांगतिलेल असतं तो असं न सांगता निघुन गेल्यामुळे ती अगतिकतेने आतापर्यंत लिहिलेली डायरी जाळुन टाकते. या डायरीबद्दल इंद्रनील तिला माझ्यापासुन काही लपवतेयस का ? असं विचारतो तेव्हा नाही हे माझं खासगी ( persnol) असल्याचं ती सांगते. तिच्या नवर्याला हे पटत नाही. पती-पत्नीच्या नात्यामध्ये तिचं अस वेगळ काय असावं याचा त्याला राग येतो व तो भट्टीमध्ये अर्धवट जळालेल्या डायरीच्या पानांना भट्टीतुन बाहेर काढुन वाचण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा एका जळत्या पानावर त्याला नाव दिसतं. बुलबुल ♥ सत्येंद्र. हे पाहताच इंद्रनीलच्या तळपायची आग मस्तकाला जाते तेव्हा हातात सळई घेवुन तो तडक बुलबुलच्या स्नानगृहात जातो जिथं ती बाथटबमध्ये बसलेली असते. तश्याच अवस्थेत तो तिला ओढुन बाहेर काढतो व हातातल्या कांबेने ( सळई) पायांवर इतकं जोरात मारतो की पायाचे पंजे पुर्ण छिन्नविछिन्न होतात. प्रचंड मारहाण व रक्तस्रावामुळे बुलबुल बेशुद्ध पडते. दुसर्या दिवशी डॉक्टराना बोलावुन तिचा इलाज करायला लावुन हा हवेली सोडुन बाहेर निघुन जातो. आता हवेलीत राहतात. बुलबुल , वेडा महेंद्र, त्याची बायको बिनोदिनी व उपचार करण्यासाठी येणारा डॉक्टर सुदिप. पायांना गंभीर इजा झाल्यामुळे बुलबुलचा पाय प्लास्टर करून ठेवलेला असतो.
एके दिवशी वेडा महेंद्र जो की इंद्रनीलचा सख्या मोठा जुळा भाऊ असतो . बुलबुलच्या शय्यनगृहात घुसतो व तिच्यावर तशा अवस्थेतही पाशवी बलात्कार करतो. यात बुलबुल मरते. आणि काही मिनिटानी जिवंतही होते. तिच्यात कालीमातेचा संचार झाल्याचं दाखवलं आहे. जसा बुलबुलच्या अंगात कालीमातेचा संचार होतो तसा चंद्र लालभडक होतो व सगळं वातावरण या लाल रंगात न्हावुन निघतं. दुसर्या दिवशी सगळ काही नॉर्मल असल्याचं दाखवलय. त्यात बिनोदिनी आपल्या नवर्याने केलेल्या बलात्काराचे पुरावे नष्ट करण्याचं काम करते व सोबतच बुलबुललाही सांगते की तो थोडासा वेडा आहे पण त्याच्याकडे सर्वकाही आहे. गाडी, बंगला, नोकरचाकर , तो थोडासा वेडा आहे पण त्यामुळेच आपण सिल्क्स साड्या व दागिणे घालु शकतो. तेव्हा तु गप्प बसावस. पुढे काहीच दिवसात वेड्या महेंद्र ठाकुरला भुतीण (witch)मारते . व गावात खुनाचं सत्र सुरू होतं. मुवीच्या क्लायमैक्समध्ये सत्येंद्र डॉक्टर सुदिपवर बुलबुल संदर्भात संशय घेतो. व आपल्या भाभीला चुक कबुल करण्यास सांगतो. तेव्हा ती खळखळुन हसते व म्हणते, " you all are same " पुढे सत्येंद्र डॉक्टर सुदिपवर खुनाचा संशय घेवुन त्याला बंदुकीचा धाक दाखवुन कोलकत्याच्या कोर्टात हजर करण्यासाठी घेवुन जात असतो. त्याच दिवशी महेंद्र ठाकुरची डेथ एनिवर्सरीही असते. रस्त्यात सत्येंद्र व सुदिप जाताना सत्येंद्रच्या सारथी शंकरचा खुन होतो. व तेव्हा सत्येंद्रला भुतीण दिसते. तो तिच्यावर गोळी झाडतो. व तिला मारण्यासाठी जंगलात धावत सुटतो तेव्हा डॉक्टर सुदिप त्याला अडवत असतो. दोघात मारामारी होते. आता डॉक्टर सुदिप भुतीणीला का मारू देत नाही ? भुतीण कोण असते? गावात होणारे खुन भुतीणीच्या हातुनच घडतात की अजुन कुणाच्या इ प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्हांला सिनेमा पहावाच लागेल.
बाकी सिनेमा मस्त आहे. 19 व्या शतकातला काळ दिग्दर्शकानी हुबेहुब जिवंत केलाय. त्याचबरोबर बंगाली कल्चर, मोठमोठ्या हवेल्या, बग्ग्या हे सारं तुम्हांला तत्कालीन बंगालातच घेवुन जातं. कलाकारांबद्दल बोलायच झालं तर बुलबुल साकारणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी अक्षरशः ते पात्र जगलीय. अख्ख्या सिनेमात तीच भाव खावुन जाते. या चित्रपटाच्या माध्यमातुन प्रेम, हिंसा, संशय, भीती, मत्सर, विरह इ मानवी भावभावनांचे अतिशय सुक्ष्म पदर कलात्मकतेने उलगडलेत. बुलबुलला तिचा नवरा मारत असताना सळईतुन टपकणारं रक्त व वअतिशय ताकदीने सळई उगारल्यावर आरश्यामध्ये पडणारं त्याचं प्रतिबिंब स्लो मोशनमध्ये मारण्यासाठी खाली येणारा हात.
रामायणातील जटायु वधाच्या पेंटिंगवर जटायुच्या अंगावर उडालेले रक्ताचे शिंतोडे. अप्रतिम फ्रेम साकारलीय. मानवी कौर्याचा हा पुरातनकालीन चेहरा आजही किती ताजा वाटतो.
स्रीयांवर होणारे अत्याचार, स्रीचं स्रीचा कर्दनकाळ ठरते हे वैश्विक सत्यही सिनेमाने प्रभावीरित्या मांडल आहे. तत्कालीन व कदाचित समकालीन स्रीयांचीही पैसा अडका, दागिणे, ऐषोआराम या भौतिक सुखासाठी स्वतःला, विकण्याची, हवा तसा वापर करू देण्याची घाण मानसिकता, बुलबुलच्या बलात्कारानंतर बिनोदिनीच्या संवादातुन अधोरेखित केलीय. वेळोवेळी सिनेमात येणारा लाल शेड, अनुरूप असं पार्श्वसंगीत व उत्तम सिनेमैटोग्राफीमुळे सिनेमा चांगला रंगला आहे. नेटफिक्लसवर तो रिलीज झाला होता पण तो युट्युबवरही आला आहे. नक्की पहा. अजुन हिंदीत डब नाही झालेला तुम्हांला इंग्रजीतच पहावा लागेल. सिनेमा पहा तृप्तीच्या अभिनयाने अस्वस्थ नाहीत झाला तर नवल होईल.
- विक्रांत शंके
9890766640
( लेखक चित्रपट समीक्षक व महाराष्ट्र जीवन लाईव्ह न्युज समुहात कार्यकारी संपादक पदावर कार्यरत आहेत.)


Comments
Post a Comment