स्रीवेदनेची अस्सल अभिव्यक्ती - उंबरठा

उंबरठा - स्रीवेदनेची अस्सल अभिव्यक्ति
 

तुकारामांनी म्हणुन ठेवलंय ,
पाण्यामध्ये मासा झोप कसा घेई ,
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे 
हे अगदी खरंय. पण एकदा एक जीवनात एकदा एक भुमिका  मिळाल्यावर नंतर दुसर्याच्या भुमिकेत जाता येत नाही. त्यामुळे त्या जीवाचं जगणं ती ससेहोलपट, त्याच्या किंवा तिच्या दुःखाचा अवकाश हे फक्त imagine करता येत. यालाच पुस्तकी भाषेत सहसंवेदना म्हणतात. अशीच महिलाबद्दलची सहसंवेदना पहिल्याच सीन पासुन जागृत करतो तो जब्बार पटेलांचा #उंबरठा हा सिनेमा. 1982 साली बनलेला शांता निसळ यांच्या बेघर कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटाचं लेखन विजय तेंडुलकर यांनी केलं आहे व गीतकार आहेत सुरेश भट. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड सारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा इस्टमनकलर प्रकारातला सिनेमा पहिल्या सीनपासुनच मनाची पकड घ्यायला लागतो. एका सुखवस्तु पांढरपेशा घरातली नायिका सुलभा ही मुंबईला जावुन समाजशास्त्रात उच्चशिक्षणातली पदवी घेवुन आलेली असते. नवरा उच्चभ्रु वकील , दीर डॉक्टर व सासुच्या   स्वतःच्या 3 -4 सामाजिक संस्था अशा पार्श्वभुमीवर सगळ काही आलबेल असतानाही तिच मन काही घरात लागत नाही. कारण पुर्वीपासुनच तिला स्री वर्गाबद्दल आस्था असते.याच विषयात तिचं स्पेशलायझेशनपण असतं. तिला करियर करायचं असत. घरी काही केल्या तिचं मन लागत नाही. व ती नेहमी उदास राहत असते. तेव्हा तिला एक नोकरी चालुन येते. शहरापासुन एका दुर आडगावात असलेल्या महिला अनाथाश्रमात महिला अधीक्षकेची पोस्ट रिकामी असते व त्यासाठी तिला जॉब ऑफर आलेली असते. तिच्या मनाप्रमाणे काम करण्याची ही नामी संधी असते. पण ही बाब घरी पतीला व सासुला पटवुन देवुन त्यांती परवानगी मिळविणं हे मोठं जिकीरीच काम असतं. 
संधी साधुन ती आपल्या नवर्याला convince करण्यात यशस्वी होते. तो ही जरासा नाखुशीनेच तयार होतो . त्या पांढरपेशा उच्चमध्यमवर्गीय घरात आईसमोर बायकोसाठी  आरोपीसारखा उभा राहतो. व तिची बाजुही उत्तम प्रकारे मांडतो. शेवटी सुलभाचं निघायचं ठरत. सुभाष तीला स्टेशनपर्यंत सोडायला येतो. व ती बराचसा प्रवास रेल्वेने व उर्वरित प्रवास टांग्याने करून  अनाथ महिलाश्रमात पोचते. तिथं तो गेटमन हिला अनाथ महिलाच समजतो. एन्ट्री करताच  जोरात दम टाकुन रजिस्टरवर नोंद करायला लावतो. पुन्हा डेजिगनेशन  पाहुन गडबडतो व सैल्युट मारून म्हणतो, नव्या अधीक्षक मैडम. इथुन सुलभाता प्रवास सुरू होतो. चार्ज घेताच ती काही नवीन निर्णय घेते. व हळुहळु आश्रमात चालणारा वस्तुता काळाबाजार, साड्यांच्या  व्यवहारातील भ्रष्टाचार व सगळ्यात चीड आणणारी गोष्ट म्हणजे आमदाराच्या बंगल्यावर आश्रमातील महिलांचा होणारा पुरवठा या सगळ्या समस्यांना सुलभा एक उत्तम प्रशासक म्हणुन हाताळते. पण आश्रमाच्या चेअरपर्सनबाईना हे सहन होत नाही. त्याचबरोबर आश्रमाच्या कमिटी मेंबर्सची पण एकुण सगळ्या प्रकाराबद्दल प्रचंड अनास्था असते. हे नॉर्मल जग असत. 
त्याचबरोबर त्याचठिकाणी अजुन एक समांतर जग चालत असत ते म्हणजे आश्रमात आलेल्या अनाथ महिलांच जग.यात कुणी परितक्त्या, कुणी कुमारीमाता.
नवर्याकडुन  समाजाकडुन प्रचंड उपेक्षा ,अवहेलना आणि पराकोटीच्या  अपमानाला तोंड देत आलेल्या. सगळीकडुन मिळणार्या कटु अनुभवांना प्रतिसाद देवुन त्यांचाही स्वभाव चीडखोर व बेरकी झालेला. समाजाच्या मुल्यव्यवस्था धारणांना छेद देणारी एक कृती आणि अख्खं आयुष्य नरकासमान होवुन गेलेल. परतीचे सगळे दरवाजे बंद झालेले. आता आश्रमाचाच काय तो आधार . पण इथंही ते शोषण आणि अपमानच. अाश्रमात सगळी अशीच उदाहरणे असतात, एक सुखवस्तु घरातली डॉक्टरची मुलगी  कुमारीमाता होते वडील स्वीकारायला तयार नसतात ,एका मुलीच्या लग्नाच्या पहिल्या रात्री तिचा नवरा धसमुळेपणानी वागतो व भितीने तिला वेड लागत अशी एक नाही अनेक उदाहरणे . सुलभा या सगळ्या दुखी जीवांना आधार देण्याचा प्रयत्न करते. यातच तिच्या समोर दोन स्रियांची समलैंगिकतची केस येते. त्यांना ती आश्रमातुन हाकलुन लावत नाही. जेव्हा  आश्रमातल्या  इतर बायका तसा आग्रह करतात तेव्हा सुलभा आपल्या निर्णयावर ठाम राहते. त्याना प्रतिप्रश्न करते. म्हणते " याना हाकलुन द्यायची भाषा करताय, पण ज्या समाजाने तुम्हांला हाकलुन दिलंय त्यांच्यालेखी तुम्हीही एक घाणच आहात, आणि समाजाने टाकुन दिलं म्हणुन या इथं आल्या आता आपण यांना टाकल्यावर या कुठं जाणार ? "....
या सगळ्या प्रकाराची सवय नसल्यामुळे तिला खुप मनस्ताप सहन करावा लागतो व महिला अधीक्षक पदाचा राजीनामा देवुन सुलभा घरी परतते. 

मात्र घरी परीस्थीती बदललेली असते. घरी आल्यावर तिची स्वतःची मुलगी तीला ओळखत नाही. नवराही तिच्याविना जगायला सरावलेला असतो. तिचं घरातलं पुर्वीचं स्थानंही हरवल्याची तीव्र जाणीव तीला होते व दुसर्या दिवशी रागामध्ये ती घर सोडुन निघुन जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सुभाष तिला थांबवतो व इथे सिनेमा संपतो.

आता मला सर्वात जास्त पात्र कोणतं आवडलं असेल तर ते गिरीश कर्नाकाडी साकारलेला सुलभाचा नवरा सुभाष. सुभाषच बायकोवर आत्यंतिक प्रेम असतं, तिच्या इच्छेसाठी तो प्रत्येक तडजोड करतो. तो तिच्यापासुन दुर राहतो, तीला वारंवार भेटायला जातो, त्याचबरोबर आपल्या शारिरीक भुकेची मर्यादा तो,प्रामाणिकपणे मान्यही करतो. त्याला वाटत असतं की माझ्यातला पुरूष कधीही हिच्या इच्छा आकांक्षेच्या आड येवु नये. तरीही या चित्रपटाबद्दल भाष्य करत असताना काही स्रीसमीक्षक मुद्दामहुन सुभाषवर टीका करून स्त्रीवादाच्या नावाखाली त्या पात्राला बदनाम करू पाहतात .चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येतं सुलभा त्या ठिकाणी टिकु शकत नाही, तिचं मनोधैर्य खचत.  उलट जेव्हा तिच्यावर आयोगाची चौकशी लागल्याचं समजतं तेव्हा सुभाष झाल्या प्रकरणात काही मदत हवीय का असही पत्राद्वारे विचारतो. सुलभा मदत नाकारते. म्हणजे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सुभाष  सुलभाच्या कोणत्याच महत्वाकांक्षेच्या इच्छेच्या आड येत नाही. तरीही त्याच्यावर रूढार्थाने उगाच ठपका ठेवला जातो. हे कुठेतरी उद्वेग आणणारं आहे. बाकी जब्बार पटेलांच दिग्दर्शन, स्मिता पाटलांचा अभिनय, गिरीश कर्नाडानी साकारलेला हळवा, संयमी, विवेकी व वास्तवाचं भान बाळगणारा सुभाष त्यात प्रसंगानुरूप सुरेश भटांची गाणी यानी नटलेला हा सर्वांगसुंदर सिनेमा सर्वांनी पहावा असाच आहे. शेवटी स्रीपुरूष समानता, स्रीवाद, पुरूषसत्ताक समाजव्यवस्था इ इ च्या कितीजरी वल्गना केल्या तरीही स्री पुरूष  दोघांच प्रेमळ नातं एकदा  बनल्यानंतर परिस्थितीमुळे सोसाव्या लागलेल्या विरहानंतर  एकमेकांना  प्रेमभराने मारलेली मिठी सारंकाही विसरायला भाग पाडते. ही ठसठसीत  जाणीव करून  देणारा उंबरठा एकदा पहाच. 

 -  विक्रांत शंके (लातूर ) 
9890766640

Comments