जातव्यवस्था - पितृसत्ता यातील घनिष्ठ सत्तासबंध व स्रीवाद
जातिव्यवस्था, पितृसत्ता यांमधील घनिष्ठ सत्ता सहसंबंध व स्त्रीवाद
#मुक्ती #साधना
सत्ता
जात, वर्गव्यवस्थेची उतरंड असो किंवा पितृसत्ता/ पुरुषसत्ता ह्या शोषणव्यवस्था ‘वर्चस्व-नियंत्रण/शोषण-शिक्षा’ ह्या जाचक प्रणालीवर आधारित आहेत. 'सत्ता' ही मध्यवर्ती संकल्पना आहे. समाज व सामाजिक प्रश्न ह्या संबंधी कोणत्याही अंगाच्या योग्य समजुतीसाठी सत्तासंकल्पनेचा अभ्यास अपरिहार्य ठरतो. 'सत्ता' हा शब्द आपण नेहमीच राजकारण, समाजकारणासंबंधी घडामोडींमध्ये ऐकत असतो, याव्यतिरिक्त सत्ता म्हणजे नियंत्रण, वर्चस्व असे सर्वसामान्यांनाही नेहमीच्या माध्यमांतून मिळणारी माहिती व अनुभवातून साधारण माहीत असते. परंतु हे ह्या वाक्यांपुरते सीमित नसून आपल्या 'वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात अनेक सत्ताव्यवस्थांचा सततचा संबंध आपल्याशी येत असतो. किंबहुना सत्तांतर्गत सर्व गोष्टींचे आपण कळत नकळत वाहक आणि प्रचारक असतो. एखादी सत्ता निर्माण होण्यापासून ते टिकण्यापर्यंत आणि सत्तेच्या ऱ्हासासही आपण सर्वसामान्य समाज कारणीभूत असतो. काय असते सत्ता म्हणजे? 'सत्ता म्हणजे इतरांवर आपला अंकुश असणे. आपण सांगतो, वागतो, बोलतो त्यालाच इतरांनीही प्रमाण मानणे. त्याचे उल्लंघन झाल्यास त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे. त्याचेच सामुदायिक अनुकरण व्हावे अशी मनिषा असणे. ते साध्य कऱण्यासाठी, संभाव्य विरोध, प्रतिकारांचा बिमोड करून लोकांवर, समूहांवर नियंत्रण, वर्चस्व ठेवण्याची क्षमता' होय. ही क्षमता गटाची, संस्थेची किंवा एका व्यक्तीचीदेखील असू शकते. सत्ता हाती आल्यास किंवा सत्तास्थानी रूढ झाल्यास, स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी, स्वतःला योग्य वाटणारी वैचारिक व्यवस्था कृतीत आणली जाते, सत्ताधाऱ्यांच्या गरजेनुसार बदललेले राजकीय, सामाजिक कायदे, नियम अमलात आणले जातात. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी शक्य तितक्या समूहाला वैचारिक, आर्थिक प्रभावाखाली घेतले जाते किंवा सामाजिक विशेष स्थान व विशेषअधिकाराचे लालच दिले जाते. जुलमी सत्तेस न जुमानणाऱ्यांची, प्रश्न विचारणाऱ्यांची, बंड करणाऱ्यांची संख्या वाढू नये म्हणून निर्बंध लादून, कारावासात कोंडून आवाज दाबला जातो आणि 'सत्तेस धोका निर्माण करणाऱ्या समूहास मृत्यूची 'शिक्षा' दिली जाते'.
हे वर्चस्व-नियंत्रण/शोषण- शिक्षेचं राजकारण, जेव्हा ह्या भूखंडाला 'भारत' हे नावही नव्हतं तेव्हापासून ते 'भारत स्वतंत्र लोकशाही गणराज्य बनला त्यानंतरही टिकून आहे. भारतीय समाजव्यवस्था (काही समूह, प्रदेश वगळता) ही धर्मव्यवस्था, जातिव्यवस्था आणि पितृसत्तेने ग्रासलेली आहे. वर्चस्व- नियंत्रण- शिक्षा ह्या प्रणालीवर आधारित असलेल्या ह्या शोषणव्यवस्थांमध्ये त्यांच्या निर्मितीच्या काळापासूनचे सहसंबंध आहेत. बहुतांश भारत देश हा समाजाच्या काही संस्थात्मक रचना-उपरचनांवर चालतो, त्यातील प्रमुख कुटुंबसंस्था, राजकीयसंस्था, शिक्षणसंस्था, प्रसारमाध्यमे ह्या रचनांवर जातिव्यस्था व पुरुषसत्तेचे वर्चस्व असल्याचे दिसते. एकमेकांमधील घनिष्ठ सहसंबंध व प्रमुख सामाजिक संस्थांवरील टिकवून ठेवलेल्या अंकुशाच्या जोरावरच जातिव्यवस्था व पुरुषसत्ता बहूतांश भारतात घट्ट पाय रोवून उभी आहे. आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर, प्राणी अवस्थेतल्या माणसापासून ते आजच्या समाजव्यवस्थेपर्यंत ह्या लाखो वर्षांत अगणित, आकलनापलीकडचे बदल संपूर्ण पृथ्वीवर झाले. परंतु भेदभावावर आधारलेली कट्टर वर्णव्यवस्था आणि पितृसत्ता/ पुरुषसत्ता मात्र बहुसंख्य भूखंडांवर कायम राहिली. पृथ्वीवरील इतर भूखंडांवर ह्या शोषणव्यवस्थांची तीव्रता कमी होऊन समाजव्यवस्थेत काही सकारात्मक बदल झाले परंतु भारतात बदलत्या काळाबरोबर कुटुंबातील पितृसत्ता, समाजातील पुरुषसत्ता, आणि जातिव्यवस्था मात्र अधिक हिंसक बनत गेली.
जातिव्यवस्थेच्या निर्मितीबद्दल आणि त्यासंबंधित बदलांबद्दल खूप वर्षांपासून अनेक अंगांनी अभ्यास, विविध मांडण्या केल्या गेल्या आणि अजूनही केल्या जात आहेत. वर्णव्यवस्थेचा इतिहास ३०००हून अधिक वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. करत असलेल्या कामांना वर्णव्यवस्थेने कप्पेबंद जातींमध्ये बंदिस्त केलं, जातिव्यवस्था मूर्त स्वरूपात येण्याची प्रक्रिया होण्यासाठी काहीशे वर्षांचा कालावधी लागला असे म्हटले जाते. संपूर्ण भारतातील प्रादेशिक, सांस्कृतिक बहुविधतेवर आणि हजारो वर्षांतील स्थानिक स्थित्यंतरांवर नजर टाकता असे लक्षात येते की, संपूर्ण भारतात सर्व प्रदेशांमध्ये एकाच वेळी सारखेच बदल घडले नाहीत. म्हणजेच भारतातील सर्व भूखंडांमध्ये एकाच कालावधीत जातिव्यवस्था आणि पितृसत्ता उदयास आलेली नाही. भारतातील काही प्रदेशांमध्ये, इतर प्रदेशांच्या तुलनेने ह्या शोषणव्यवस्था प्रस्थापित होण्याच्या कालखंडात कमी-अधिक प्रमाणात फरक आहे. व ह्या प्रदेशांतील जात-पितृसत्तेच्या व इतर शोषणाच्या तीव्रतेच्या प्रमाणात इतर प्रदेशांच्या तुलनेत फरक असल्याचे लक्षात येते. परंतु कालखंडातील फरक असला तरीही, शोषणावर आधारित इतर उतरंडी आणि पितृसत्ता/पुरुषसत्ता ह्या, सर्व भौगोलिक प्रदेशात अस्तित्वात आल्याच आणि त्यांचे वर्चस्व आजही टिकवून आहेत. जातिव्यवस्था ही ब्राह्मण-वैश्य-क्षत्रिय-शूद्र- अतिशूद्र (महात्मा फुलेंनी केलेल्या मांडणीप्रमाणे सर्व वर्णातील स्त्रियांना ह्या समाजातील उतरंडीच्या सर्वांत शेवटी गणले गेले.) ह्या उतरंडीवर आधारित आहे. ब्राह्मणवर्णीयांनी स्वतःला देवदूत म्हणवून देवाची भीती दाखवून, जातिव्यवस्थेची उतरंड अस्तित्वात आणली. उतरंड टिकून राहावी म्हणून कामाचा श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जा ठरवून, उच्चनीचता, समाजामध्ये भेदभाव निर्माण केला गेला. त्यामध्ये १. बौद्धिक श्रम करणारा ब्राह्मण वर्ण/जात सर्वश्रेष्ठ
२. तुच्छ ठरविलेली कामे न करणाऱ्या जाती म्हणजे वैश्य- क्षत्रिय वर्ण
३. कमी, घाण काम असा दर्जा ठरविलेली, कष्टाची कामे करणाऱ्या जाती म्हणजे शेतकरी, सुतार, लोहारकाम करणारे समूह आणि
४. सर्वांत जास्त घाण ठरविलेले काम, अतिशारीरिक कष्टाचं काम आणि 'सेवा' असा दर्जा दिलेले काम करणाऱ्या जाती, अशी उतरंडीची रचना केली. ब्राह्मणांचे वर्चस्व टिकून राहावे म्हणून ज्ञानसंपादन करण्यास व ज्ञान देण्यास इतर जातसमूहांना बंदी केली, समाजाच्या मनातील देवाची भीती मजबूत केली, उच्च जातींच्या मनात अस्पृश्यता, भेदभाव भरला आणि उच्चजातीय समूहांनी आपले उच्च स्थान टिकविण्यासाठी भेदभाव पळला, जातवार वस्त्या वसविल्या, रोटीबेटी व्यवहार जातीतच, प्रत्येक जातीने ठरवून दिलेले कामच करायचे अशा जाचक निर्बंधांची स्वीकार्यता सर्व जातींमध्ये निर्माण केली गेली. ह्या सर्व जाती व्यवहारासाठी एकमेकांवर अवलंबून होत्या, त्यामुळे जातिव्यवस्था समजाला जखडून राहणे शक्य झाले. जातिव्यवस्थेच्या प्रचलित अभ्यासानुसार असे म्हटले जाते की मनू ह्या ब्राह्मणाने 'मनुस्मृती' नावाची समाजातील सर्व वर्णांसाठी दंडसंहिता लिहिली, ही दंडसंहिता राबविण्याचा अधिकार अर्थातच वरिष्ठ वर्ण, ब्राह्मणांकडे होता आणि मुख्यतः शूद्रांना आणि स्त्रियांना नियम मोडल्यास जाचक शिक्षा ह्या दंडसंहितेत लिहून ठेवल्या होत्या आणि त्याप्रमाणे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी काटेकोरपणे ही दंडसंहिता पाळली गेली आणि आजही तीच मनुस्मृतीतील दंडसंहिता समाजव्यवस्थेत राबविण्याचा, टिकवून ठेवण्याचा, अंमलात आणण्याचा यशस्वी प्रयत्न मनूचे वारसदार धर्मगुरू, शंकराचार्य, मठाधिपती करताना दिसतात कारण आजही हे त्यांना मनूने ब्राह्मणी जातिव्यवस्थेचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नेमून दिलेले काम आहे (Tribune, 2020). भारतात काही धर्म बाहेरून आले व अनेक धर्मांची सनातन धर्माला पर्याय म्हणून निर्मिती झाली. परंतु इतर धर्मांमध्ये धर्मांतरित झालेल्या समाजाच्या रोजच्या जगण्यातील व्यवहारावर अजूनही पितृसत्ताक जातिव्यवस्थेचा व दंडसंहितेचा पगडा कायम आहे, त्यामुळे दुसऱ्या धर्मात धर्मांतरित होऊनही जातिव्यवस्था व पितृसत्तेची जाचक उतरंड श्रेष्ठ- कनिष्ठता हे कायम राहिले. आजही दलित जातीतील व्यक्ती जातिव्यवस्थेतील सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाला कंटाळून, घाण ठरविलेल्या कामाला कंटाळून किंवा इतर कारणांमुळे धर्मांतरित होऊन ख्रिश्चन होते तरीही तिला अस्पृश्यतेचा, हिंसेचा सामना करावाच लागतो अनेकांना जीवही गमवावे लागले (Chatterji, 2008). ब्राह्मणेतर जातीही त्यांना ठरवून दिलेली किंवा सत्तेच्या, सामाजिक बंधनांच्या भीतीच्या जोरावर करण्यास भाग पाडलेली कामे व नियम आजपर्यंत पाळत आल्याचे स्पष्ट दिसते, आणि आजही मनुस्मृतीत ठरवून दिल्याप्रमाणे उतरंडीतील खालच्या जातीतील लोकांनी उन्नतीचा, जातिव्यवस्थेचे नियम मोडायचा प्रयत्न केला तर उतरंडीतील वरच्या जातीतील मुख्यतः पुरुष, त्यांना मनुस्मृतीत ठरवून दिलेल्या भयानक 'शिक्षा' मृत्युदंड देताना दिसतात. परिणामी ह्या समाजातील मुरलेल्या, मजबूत जातिव्यवस्थेपुढे कट्टर धर्मव्यवस्थांपुढे भारताच्या संविधानीय कायद्यांनाही शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड संघर्षातून जावे लागते.
पुरुषसत्तेच्या उदयाबद्दल, वाढ आणि इतर स्थित्यंतरांबद्दलदेखील असाच सखोल अभ्यास, मांडण्या केल्या गेल्या आणि अजूनही चालू आहेत. पितृसत्तेचा उगम हा एका घटनेतून झालेला नसून, किमान २५०० वर्षांच्या कालावधीमध्ये पितृसत्ता निर्माण झाली (Lerner, 1986).
स्त्रीवादाच्या प्रचलित अभ्यास आणि मांडणीनुसार, शेती, खाजगी संपत्तीची निर्मिती व ती वारशाने पुढे स्वतःच्याच पुरुषवंशास मिळावी, स्वतःचाच जनुकीय वंश वाढावा ह्या पुरुषाच्या 'सत्ताकेंद्री आसक्तीमुळे' पुरुषसत्ता उदयास आली. आणि आजही पितृसत्तेची लक्षणे व अंमबजावणी ही मुळात स्ववंशवृद्धीकेंद्री असल्याचे लक्षात येते. त्यासाठी कुटुंबातील मुलींची योनिशुचिता भंग होऊ न देणे, मुलीवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे हे मुलीच्या वडिलांना व कुटुंबातील, स्वजातीय समाजातील स्त्री-पुरुषांना धर्मकर्तव्य वाटते. पितृसत्ताक समाजव्यवस्था मूर्त स्वरूपात असताना, जातिव्यवस्थेची निर्मिती झाली, साहजिकच प्रमुख समाजसंस्थांची (कुटुंबसंस्था, राज्यसंस्था, शिक्षणव्यवस्था, प्रसारमाध्यमे) सर्व धोरणे पुरुषांच्या हातात गेली आणि त्यातही ब्राह्मण, उच्चजातीय पुरुषांच्या हातात गेली, आजही ही परिस्थिती बदलेली नाही. पितृसत्ता/पुरुषसत्ताक व्यवस्थेत सत्तानियंत्रण हे पुरुषांच्या हातात असते. पुरुष परंपरागत नेमून दिलेल्या कर्त्यव्यानुसार आणि सत्तेची आसक्ती व विशेष स्थानाच्या लालचेपायी स्त्रियांच्या लैंगिकतेवर, प्रजननावर, संपत्तीवर, विचारांवर, श्रमांवर, इच्छांवर, अगदी जन्मावर आणि सर्व मानवीय अधिकारांवर नियंत्रण ठेवत आले आहेत आणि अजूनही ठेवत आहेत. कुटुंबसंस्था, धर्मसंस्था ह्या नियंत्रणव्यवस्था सत्ताहीन घटकांना बंड करण्याची हिंमत एकवटूच देत नाहीत पण गरज लागल्यास, सत्ता टिकविण्यासाठी जातिव्यवस्थेचे वाहक, मुख्यतः उच्चजातीय पुरुष व काही प्रमाणात स्त्रिया हे सत्ताहीन समूहाचे जास्तीत जास्त नुकसान आणि जास्तीत जास्त क्रूर हत्या करताना व दहशतच माजवताना दिसतात. ते भीती बाळगत नाहीत. किंबहुना हिंसक कृतीत त्यांना जिंकल्याचा आनंद मिळत असतो. पितृसत्ता/ पुरुषसत्तेचे स्वरूप त्याहूनही भयानक आहे. मूलतः नैसर्गिक, जैविक व्यवस्था नसूनही, ही पितृसत्ता/पुरुषसत्ता आजही जगभर टिकून आहे, किंबहुना जगभर सत्ताधारी पुरुषसत्ताक विचारांच्या वाहकांनी, नियंत्रक वर्ण, वर्ग समूहांनी सामूहिकरित्या टिकवली आहे. मुलं, पुरुष जन्मतानाच हिंसक, वर्चस्ववादी जन्मत नाहीत. पितृसत्ताक समाज जाणीवपूर्वक नियंत्रण, हिंसा, वर्चस्व मुलांना शिकवतो. निर्लज्ज, बेफिकीर बनवतो. आणि जाणीव करून देतो की असं असणं म्हणजे 'पुरुष' असणं आहे. पितृसत्ता टिकविली जाते ती पुरुषांना रोज जगताना वर्चस्व कायम ठेवण्याचे कृतिकार्यक्रम देऊन. स्वतःच्या जन्मदात्या आईपासून, प्रेम करणाऱ्या प्रेयसी/पत्नी, बहिणीपासून ते समाजातील सर्व स्त्रिया व इतर लैंगिक ओळख असणाऱ्या घटकांवर, पुरुषसत्तात्मक नियंत्रण असावेच ही भावना 'कमी-अधिक प्रमाणात' सगळेच पुरुष सतत बाळगतात. आणि म्हणूनच वर्चस्वभाव हा पितृसत्तेचा कणा ठरतो. या वर्चस्वाच्या-सत्तेच्या/ विशेष अधिकारांच्या मोहापोटी पुरुष अनेक मानसिक, शारीरिक, कौटुंबिक हिंसेचे, सामाजिक हिंसेचे, कळत नकळत रोजच वाहक बनतात. पुरुषासत्ता हा विचार आहे. तो कोणाच्याही मनाची पकड घेऊ शकतो. धर्मव्यवस्थेने लादलेल्या धर्मकर्तव्यांमुळे, नियमामुळे किंवा स्वतःचे कुटुंबातील अस्तित्व टिकविण्यासाठी, स्त्रियादेखील पितृसत्ताक धर्मव्यवस्थेच्या पोषणामध्ये सहभाग देत आल्या आहेत. पुढच्या पिढीतील स्त्रियांवर नियंत्रण, कौटुंबिक, सामाजिक हिंसांमध्ये सहभाग देत आल्या आहेत. तेही पुरुषाचं सर्वश्रेष्ठस्थान टिकावं म्हणूनच. जगातल्या बहुसंख्य घरांपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील, निसर्गावरील सर्व वर्चस्वाच्या यंत्रणा पुरुषांच्या हाती एकवटलेल्या आहेत आणि विध्वसंक हिंसेच्या, दहशतीच्या जोरावर ते सामूहिकरित्या संपूर्ण पृथ्वीवर अंकुश ठेवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत. ही सर्वश्रेष्ठ ठरविलेली 'वर्चस्ववादाची सत्ता' टिकवून ठेवण्यासाठी जगभर वर्गव्यवस्था, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, पितृसत्ता व इतर अनेक शोषणव्यवस्था काम करत असतात आणि प्रत्येक सत्ताहीन व्यक्तीवर अंकुश सातत्याने टिकवून ठेवत असतात. हा सर्वश्रेष्ठ वर्चस्व टिकविण्यासाठी कळत नकळत झटणाऱ्या परंतु सर्वश्रेष्ठ सत्तेचे दावेदार नसलेल्या सर्व पुरुषांसाठीसुद्धा, माणूस म्हणून हा सर्वश्रेष्ठ ठरविला गेलेला वर्चस्ववाद आणि पितृसत्ता घातकच आहे. तरीही हा आवाढव्य हिंसक खटाटोप जगभर का केला जातो? तर स्ववंश-वृद्धी आणि सर्वश्रेष्ठ 'वर्चस्ववादाची सत्ता' बळकट होण्यासाठी.
वरील लिखाणातुन लक्षात आलेच असेल की, जातिव्यवस्था व पितृसत्ता/ पुरुषसत्ता ह्या भारतीय समाजव्यवस्थेतील प्रमुख शोषणव्यवस्था हजारो वर्षांपासून एकमेकांमधील सत्तासहसंबंध कशाप्रकारे व का टिकवून आहेत? ह्या हजारो वर्षांत भारतातील सर्व प्रदेशांमध्ये, नोंदणी असलेले-नसलेले अनेक बदल झाले, वेगवेगळ्या परकीय, स्वकीय सत्ता राज्य करून गेल्या. त्यात राजेशाही, सरंजामशाही, मोघल, पोर्तुगीज, इंग्रजांची सत्ता, लोकशाही, भांडवलशाही इत्यादी तसेच इतर अनेक स्थित्यंतरे झाली व प्रत्येक दशकात शोषणाविरुद्ध बंड झाले त्याने भारतीय समाजव्यवस्थेत प्रचंड उलथापालथ व चांगले-वाईट परिणाम होत गेले. भारतीय स्त्रियांच्या व कनिष्ठ ठरविलेल्या जातींच्या उत्थानात आत्तापर्यंत अनेक क्रांतिकारकांचा, सुधारकांचा, लेखकांचा, कलाकारांचा, मोठा वाटा आहे, परंतु ह्या बदलाची मुख्य मेख ज्यांनी मारली त्या नावांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपूर्ण आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचून भारतीय स्त्रियांना व ब्राह्मणेतर सर्वजातीय समाजाला माणूस म्हणून जगण्याचे, संचाराचे, ज्ञानार्जनाचे, बोलण्याचे, अधिकारासाठी भांडण्याचे सर्व अधिकार मिळवून दिले. परिणामी आज भारत संविधानावर आधारित, लोकशाही गणराज्य म्हणून अस्तित्वात आहे. तरीही भारतीय समाजव्यवस्थेतील शोषण व्यवस्था संपल्या नाहीत पण शोषणाचे स्वरूप बदलले.
जातिव्यवस्था, पितृसत्ता/ पुरुषसत्ता आजही विचार आणि कृतीत बळकट आहेच. पण, सांविधानिक अधिकारांमुळे सत्ताहीन समूहांची, व्यक्तींची आवाज करण्याची, शोषण व्यवस्थेला शह देण्याची ताकद कितीतरी पटींनी वाढली.
वर्तमानातील जातिव्यवस्था व पुरुषसत्ता
हे जातिव्यवस्थेला, पुरुषसत्तेला शह देणारे व न देणारे सर्वच थोड्या-अधिक प्रमाणात आजही जातिव्यवस्थेचे पितृसत्ता/पुरुषसत्तेचे वाहक आहेत. जातिव्यवस्थेची प्रमुख लक्षणे आजही मिटलेली नाहीत. (पण, काही लक्षणांना खिंडर पडायला मात्र सुरुवात झाली आहे.) त्यांचे ग्रामीण व शहरी भागात स्वरूप बदलल्याचे दिसते. जन्मसिद्ध जात, अस्पृश्यता, जातीतच रोटीबेटी व्यवहार, जातवार वस्त्या, जातपंचायत, जातीने नेमून दिलेली कामे, जातीच्या या गती-नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी शिक्षा ही जातिव्यवस्थेची लक्षणे आजही बहुतांश ग्रामीण व नागर भागात ठळकरीत्या कार्यरत असल्याचे दिसतात. खैरलांजी , केल्वेममणी, बथानी टोला, झज्जर, रमाबाई हत्याकांड, सोनई हत्याकांड, पाथर्डी हत्याकांड, नितीन आगे, (अशा अनेक हत्याकांडांची यादी मोठी आहे.) ही प्रकरणे आपल्याला माहीत आहेत. पण शहरी भागात जातिव्यवस्थेने आणि पुरुषसत्तेने धारण केलेले विघातक रूप त्याहूनही घातक आहे असे म्हणावे लागेल. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतून आणि पुरुषसत्तेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी शहराची - पर्यायाने शिक्षणाची - वाट धरलेली मुलंमुली ज्या पद्धतीचे शोषणाचे स्वरूप अनुभवतात ते अधिक वेदनादायी आहे. कारण कालपर्यंत लोकांनी जाणते आणि अजाणतपणे जातिव्यवस्था आणि पुरुषव्यवस्थेतून वाट्याला येणारी कामे, होणारा अपमान आणि शोषण, अन्याय-अत्याचार हे आपल्या वाट्याचे भोग आहेत अशा रूढ समजावर दिवस काढले. मात्र, आज वाट्याला येणारे काम, होणारा अपमान आणि अन्याय-अत्याचार व शोषण हे जात आणि पितृसत्तेतून होत आहे हे स्पष्ट समजत असल्याने व सबंध यंत्रणाच या जात व पितृसत्तेच्या संगनमताने कार्यरत असल्याने त्याविरुद्ध त्वरित बदलाची अपेक्षा भंग पावते आणि त्यातून वाट्याला येणारे मानसिक खच्चीकरण हे अधिक वेदनादायी आहे. अशी शहराकडे आलेली मुलंमुलीही शिकून आत्मविश्वासाने या शोषणाविरुद्ध बोलू लागतात, चळवळींचे बोट धरू लागतात त्या वेळेस भरल्या शहरातही वाट्याला येणारे एकाकीपण त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू लागते. हजारो वर्षांपासून स्त्रियांनी जेव्हा जेव्हा पितृसत्तेला/पुरुषसत्तेला विरोध दर्शविला तेव्हा तेव्हा त्यांच्या वाट्याला मानसिक-शारीरिक हिंसा, अवहेलना, अपमान, शोषण आले आहे. संस्कृतिरक्षण, धर्मरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांवर, योनिशुचितेवरील नियंत्रण मजबूत करून शोषण केले जाते.((Times of India news) २००९ ला मंगलोर, पबमधील स्त्रियांवरच्या हल्ल्याचे प्रकरण व अशा स्त्रियांवरील हिंसक हल्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे) अनेक धर्मांध वर्चस्वाला न जुमानता, जेव्हा मुली निर्णय घेऊ लागतात, बोलू लागतात तेव्हा त्या पुरुषसत्ताक जातिव्यवस्थेचे नियम मोडणाऱ्या मुलींना नियंत्रणात ठेवण्यासाठी जबरदस्तीने लग्न, बलात्कार, मानसिक, शारीरिक छळ, संचारबंदी, शिक्षणावर बंदी, हे कमी म्हणून social mediaच्या माध्यमातून, झुंडीच्या दहशतीतून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाला या समाजातील कोणत्याही जाती कोणतेही वर्ग अपवाद ठरू शकले नाहीत. आजूबाजूला पुरुष असो-नसो पितृसत्तेची भीती सतत स्त्रियांना प्रत्येक कृती करताना नियंत्रण करीत असते. मोठ्याने हसण्यापासून ते लग्न कोणाशी करायचे व मूल जन्माला घालायचे की नाही, मुलगा की मुलगी, अशा सर्वच गोष्टींवर पितृसत्ताक विचार नियंत्रण करत असतात व नियंत्रणाची अंमलबजावणी स्वतः मुलीचे आई-वडील व इतर कुटुंबीय करत असतात. कुटुंबातील लादलेल्या जबाबदाऱ्या व स्वतःच्या कामाच्या ठिकाणी अस्तित्व टिकविताना, घरी व कामावर दोन्हीकडे स्त्रीच्या दमानाची व्यवस्था केलेली असते. सर्वसामान्य पुरुषांबरोबरच पुरोगामी विचाराच्या आणाभाका घेणाऱ्यांपैकी कितीतरी मंडळी स्त्रीशोषणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग देत असतात. (अर्थात हा सहभाग लादून आणि स्वीकृतीतूनच येतो.)
वर्चस्ववादी विचारसरणींविरुद्ध संघर्षाचा वारसा
जर आजही ह्या भारतीय समाजातील जातिव्यवस्था आणि पितृसत्ता/ पुरुषसत्ता टिकून आहे तर, पृथ्वीवर 'वर्चस्ववाद, इतर शोषणव्यवस्था निर्माण होण्याची सुरुवात होत असताना ते आजपर्यंत, त्याविरुद्ध कोणी संघर्ष केला नसेल का? उत्तर आहे हो, दमानाविरुद्ध सत्ताहीन समूहांनी जाचक सत्तांविरुद्ध कायम संघर्ष केला. स्वतः सत्ताधारी समूहात जन्माला येऊनही वर्चस्वाच्या, शोषणाच्या समाजघातक विचाराविरुद्धच संघर्ष करणारा म्हणून, 'गौतम बुद्ध' हे योग्य उदाहरण आहे. बुद्धाप्रमाणेच, बुद्धापूर्वी व नंतर, पृथ्वीवरील इतर सर्व भूखंडांवर, त्या त्या कालखंडातील, स्थानिक वर्चस्ववादी छोट्या मोठ्या सत्ता व्यवस्थांविरुद्ध अगणित, ज्ञात-अज्ञात समूहांनी (सर्व देशांमधील आदिवासी, कामगार, स्त्रिया, काळ्या स्त्रिया इत्यादी), व्यक्तींनी (कार्ल मार्क्स, नेल्सन मंडेला इत्यादी) संघर्ष केला, शोषणव्यवस्था कमकुवत केल्या, काहींना जाचक व्यवस्था उलथवूनही टाकता आल्या. आजही हा सर्वश्रेष्ठ वर्चस्ववादाविरुद्धचा संघर्ष नेटाने पृथ्वीच्या सर्व कोपऱ्यांमधून रोज चालू आहे. सर्वश्रेष्ठ ठरवलेल्या वर्चस्ववादाला पुष्टी देणाऱ्या इतर सत्तांविरुद्ध (पितृसत्ता, जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था) संघर्ष करून सत्ताहीन समूह, प्रत्येक सत्ताहीन व्यक्ती वर्चस्ववादाला, वर्चस्व-नियंत्रण/शोषण-शिक्षा ह्या शोषणप्रणालीला जमेल तसा शह देऊ पाहात आहेत. सर्व देशांतील कामगार शोषणाविरुद्ध, स्त्रिया घरातील पितृसत्तेपासून समाजातील पुरुषसत्तेविरुद्ध, वर्णभेदाविरुद्ध जाहीरपणे बोलत आहेत. हक्क, अधिकार भांडून मिळवत आहेत. शोषणव्यवस्था खूप जास्त बलशाली आहेत, वर्चस्व-नियंत्रण/शोषण-शिक्षा ह्या शोषणप्रणालीप्रमाणे, बंड करणाऱ्यांचे आवाज दाबण्याचे, त्यांना संपविण्याचे सतत प्रयत्न केले जात होते आणि आजही केले जातात. परंतु हा गुलामी नाकारण्याचा, बंड करण्याचा, शह देण्याचा वारसा थांबत नाही आणि थांबणारही नाही.
स्त्रीवाद- समाजाची उन्नती मोजणारे मापदंड.
ह्या वर्चस्ववादाच्या सत्तेला विरोध करण्यासाठी जगभर प्रत्येक शतकात बंडाच्या जागतिक व स्थानिक पातळीवर लाटा उसळत होत्या, प्रत्येक गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली जात होती व गुलामांचा समूह त्याविरोधात आवाज उठवत होता. हिंसेविरुद्ध, मूठभर मालकांच्या हातांमधील सत्तेविरुद्ध कामगारांची सत्ता अशा पर्यायी व्यवस्थेच्या मांडण्या केल्या जात होत्या, भारतातदेखील स्वातंत्र्याच्या चळवळींसोबत, भूदान चळवळ, कनिष्ठ जातीय व स्त्रियांना माणूस म्हणून स्थान निर्माण करण्यासाठी काही सुधारक हालचाली करत होते, महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्ञानार्जनाचा अधिकार नव्हता त्या ब्राह्मणेतर जातींतील काही स्त्री- पुरुषांनी आपण करत असलेले रोजचे श्रम, अस्पृश्यता, समाजातील अमानवी दुर्व्यवहार, स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान अशा अनेक विषयांना अभंगांच्या रचनांमधून स्पर्श केला, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. त्यांना ब्राह्मणेतर समाज संत म्हणू लागला, ह्या संतांमध्ये काही कनिष्ठ जातीयदेखील होते, ज्ञानार्जन करून समाजाला प्रबोधित करून ह्यांनीदेखील जातिव्यवस्थेचे नियम मोडले होते. ज्याच्या शिक्षादेखील मनुस्मृतीने ठरवून दिलेल्या दंडसंहितेप्रमाणे त्यांना दिल्या गेल्याचे म्हटले जाते. स्त्रियांच्या दुय्यमत्वावरच, सर्वश्रेष्ठ ठरविलेल्या वर्चस्ववादाची सत्ता टिकून आहे; त्यामुळे वर्चस्ववादाच्या सत्तेत स्त्रियांना माणूस म्हणून स्थान नव्हते. त्यानंतर जगभर उभ्या राहिलेल्या पर्यायी मांडण्यांमध्ये, केलेल्या चळवळींमध्येदेखील स्त्रियांचा माणूस म्हणून विचार केला जात नव्हता. इथेच स्त्रीवादाची गरज निर्माण झाली. 'स्त्रीवाद हे समीक्षणाचं, आत्मपरीक्षणाचं शास्त्र आहे. स्त्रीवाद हा निषेध, आंदोलन, प्रश्न विचारण्यासाठी उंच केलेला आवाज एवढ्यापुरताच सीमित नसून, स्त्रीवाद हे आत्मप्रतिबिंब दाखविणारा आरसा आहे, आंतरिक भीतीवर विजय मिळवत स्वतःच्या मौल्यवान असण्याची जाणीव आहे 'स्त्रीवाद' (Jain, 2002). निसर्गकेंद्री माणूसपणाकडे घेऊन जाणारी वाट आहे, स्त्रीवाद. पश्चिमेकडील देशांमध्ये पहिल्या स्त्रीवादी आंदोलनांना सुरुवात झाली. ही सुरुवात पश्चिमेकडील गोऱ्या स्त्रियांनी केली आणि ही आंदोलने देशाच्या नागरिक म्हणून मतदानाच्या, माणूस म्हणून अधिकारांच्या लढ्यांपासून झाली. तीच स्त्रीवादाची लाट पुढे पश्चिमेकडील देशांमधून जगभर पसरली. स्त्रीवादाची लाट सर्वदूर पसरत असताना, प्रत्येक देशातील प्रश्नांनुसार पुनर्मांडण्यादेखील झाल्या ज्याची सुरुवात काळ्या स्त्रियांनी काळ्या स्त्रियांचा स्त्रीवाद मांडून केली. स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून विचार केल्यास भारतातील महात्मा फुले, र.धों कर्वे, काही संत स्त्रिया, पंडिता रमाबाईंसारखे काही सुधारक हे स्त्रीप्रश्नांना घेऊन 'स्त्रीवाद' ही संकल्पना भारतात येण्याआधीपासून काम करत होते, त्यामुळे भारतात स्त्रीवादी विचारांच्या पेरणीला आधीच सुरुवात झाली होती. भारतातील भेदभावग्रस्त मानसिकता आणि बहूआयामी समाजव्यवस्थेचा परिणाम सुरुवातीला भारतीय स्त्रीवादाच्या मांडणीवरदेखील झाला. जातिव्यवस्थेच्या उतरंडीच्या व ज्ञानार्जनाच्या इतिहासानुसार पुन्हा एकदा शोषणव्यवस्था उद्धस्त करणाऱ्या हत्याराची सूत्रं सर्वप्रथम उच्च जातीतील स्त्रियांच्या हाती पडली. पुढे भारतातही स्त्रीवादाची पुनर्मांडणी व योग्य अंमबजावणीला घेऊन संघर्ष झाला. भारतीय समाजातील कनिष्ठ ठरविल्या गेलेल्या जातींतील, शेवटच्या स्त्रीचे प्रश्न, सत्ता, सुविधा, अधिकार यावर प्राधान्याने चर्चेस सुरुवात झाली. आणि आजही त्या दृष्टीने काम चालू आहे.
स्त्रीवादी दृष्टिकोन हा वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी, पितृसत्ता/पुरुषसत्ताक व्यवस्थेसाठी, जातिव्यवस्थेसाठी घातक आहे, म्हणूनच स्त्रीवादाच्या चळवळींची सुरुवातीपासूनच चेष्टा, अवहेलना झाली आहे. भारतातील धर्मव्यवस्था, स्त्रीवाद फोफावू नये म्हणून तेव्हापासून आजपर्यंत कटाक्षाने काळजी घेत आहेत. आज स्त्रीवादाच्या अभ्यासात, मांडणीत व प्रचारात प्रगती होत असल्याने, स्त्रीवादाबद्दल प्रचंड चुकीचे समज पेरले जात आहेत. स्त्रीवादी विचारधारेचे चुकीचे चित्र समाजासमोर उभे केले जात आहे. पुरुषसत्तेच्या लेखी अशा नियम तोडणाऱ्या स्त्रियांवर नियंत्रण ठेवण्याची, त्यांना शिक्षा देण्याचे काम कुटुंबव्यवस्था, पितृसत्ताक जातिव्यवस्थेने कुटुंबातील, स्वजातीतील पुरुषांना नेमून दिले आहे आणि पुरुष (दबाव व स्वीकृतीतून स्त्रिया) ते नेटाने करत आले आहेत हा स्पष्ट भ्याडपणा आहे, ही भीती आहे सत्ताधाऱ्यांना अस्तित्व संपण्याची. पुरुषसत्ताक म्हणून मिळणारे सर्व फायदे गमावण्याची. आपला बंद दरवाजा आतलं पितळ उघडं पडू नये, स्वतःला जातिव्यवस्था, पितृसत्तेने मिळवून दिलेली सत्ता विशेष अधिकार सोडावे लागू नयेत, आत्मटीका करावी लागू नये, पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये आपण दुय्यम दर्जाने वागवत असलेल्या स्त्रीची माफी न मागण्याची मुभा असते. पुरुषसत्तेचा ऱ्हास झालाच तर, आपण दुय्यम वागवणाऱ्या स्त्रीची माफी मागावी लागेल, ती मागावी लागू नये म्हणून बदलापासून भिऊन काढलेला पळ आहे हा. स्वतःला पुरोगामी समजणारे, न समजणारे, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या विचारांचा पाईक म्हणून समाजातील इतर प्रश्नांवर नेटानं काम करणाऱ्यांनादेखील वैयक्तिक आयुष्यात मैत्रीण/प्रेयसी/पत्नीने केलेल्या टीकेला, आत्मटीकेला सामोरे जाणे, ह्या वर्चस्व संपण्याच्या भीतीपासून, पुरुषसत्तेच्या जोखडापासून मुक्त होणे जड जाते. ते कालसापेक्ष किंवा गरजेचे वाटत नसल्याने याकडे दुर्लक्षच करताना दिसतात. मग स्त्रीवादाचा उल्लेख एखाद्या शिवीसारखा केला जातो. पण, पुरुषसत्ता पुरुषांचे माणूस म्हणून जगण्याचा, रडण्याचा, निस्सीम प्रेम करण्याचा, संवेदनशील असण्याचा, मुक्त जगण्याचा अधिकार हिरावून घेते. मुलं वाढत असताना ते मरेपर्यंत त्यांच्या मेंदूवर सतत ओझं असतं ते त्यांची ताकद सिद्ध करण्याचं, आर्थिक, कौटुंबिक नियंत्रण टिकविण्याचं. स्वजातीय समाजातील प्रतिमेचं. आणि पुरुष ते ओझं आयुष्यभर बाळगतात, जवळच्या माणसावर हिंसेचा प्रयोग करतात. स्वतःचं 'पुरुष' असणं सिद्ध करण्यात तीळ तीळ खपतात, आणि जे हे ओझं झुगारतात ते बुद्ध, जोतीबा फुले, डॉ. आंबेडकर बनतात, आणि समाजाला नवी दिशा देतात.
पृथ्वीवरील पुरुषसत्ताक वर्चस्ववाद टीकविण्यासाठी केला जाणारा अनेक पातळींवर निसर्गाचा ऱ्हास, जातीय धार्मिक दंगली, युद्ध, विध्वंस, न्यूक्लिअर बॉम्बसारख्या हत्यारांची निर्मिती ही हिंसा माणसाला प्रगतीच्या नाही तर 'अंताच्या' ऱ्हासाच्या दिशेने घेऊन जातेय. माणसाला सुंदर जगण्यासाठी वर्चस्व- शोषण जातिव्यवस्था, पुरुषसत्ताक विचारसरणीची गरज नाही तर प्रेम, स्वातंत्र्य, समानतावादी मूल्य, निसर्गकेंद्री जीवनाची गरज आहे. माणूस मूलतः निसर्गकेंद्री, समानतावादी मूल्यावर आधारित जीवन मातृसत्ताक /मातृप्रधान कालखंडात हजारो वर्षे जगत होता. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील आदिवासी समूह बहुतांश शोषणमूल्यांपासून पूर्णतः लांब राहून सुंदर आयुष्य जगत होते. पृथ्वीवरील काही भूखंडांवर काही आदिवासी समूह आजही निसर्गकेंद्री, समानतावादी मूल्यांवर आधारित जीवन जगतात. हेच जीवन माणसाला आनंदाकडे, प्रगतीकडे घेऊन जाईल, त्यामुळे असे जीवन परत मिळविण्याची लढाई लढताना वर्चस्ववादाविरुद्ध, निसर्गाच्या ऱ्हासाविरुद्ध, जातिव्यवस्था, पितृसत्तेविरुद्ध/ पुरुषसत्तेविरुद्ध उभे ठाकावेच लागेल कारण, शेवटी मुद्दा आहे तो जग बदलण्याचा आणि जग बदलण्यासाठी पूर्वअट आहे ती विचारबदलाची…!
संदर्भ:
Chatterji, A. (2008, September 13). Hindutva's violent history. tehalka magzine and countercurrents.org.
jain, J. (2002). Indigenious Roots of Feminism. . Sage publication.
Lerner, G. (1986). Women and History.
Petress, D. K. (n.d.). Power: Definition, Typology, Description, Examples, and Implications.
Power: Definition, T. D. (n.d.).
Tribune, D. (2020, may 31). Women’s entry to Shani temple will increase rapes: Shankaracharya. Chattisagadh, India .


Comments
Post a Comment