महामार्गावरच्या खुनशीपणाची कहाणी DUEL

महामार्गावरच्या खुनशीपणाची कहाणी DUEL
तुमच्यापैकी   बऱ्याच जणांनी "Duel" पाहीलाही असेल,
तर "Duel" हा स्टीव्हन स्पीलबर्गने ( प्रतिभावान अमेरिकन दिग्दर्शक) १९७१ मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. . कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान, ग्राफिक्स वैगरे उपलब्ध नसणाऱ्या काळात Action Thriller  चित्रपट बनवून त्याने हॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री केली. पुढे स्टीव्हन  हॉलीवूडचा एक ताकदीचा दिग्दर्शक ठरला तो का ? हे या चित्रपटवरूनच दिसुन येतं .   या चित्रपटाच्या निमित्ताने  स्टीवनने दिग्दर्शनाच्या कितीतरी नवीन जागा शोधल्या व त्या उत्तमरीत्या मांडलेल्या आहेत. यात Duel   शेवटपर्यंत प्रेक्षकाला बांधून, गुंतून ठेवतो हेच या चित्रपटाच्या यशाचं मोठं गमक आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना जास्ततर स्टीवनवर बोललं जातं पण या  चित्रपटाचा स्क्रीनप्लेही काही कमी भारी नाही.  रिचार्ड मॅथ्यूसन यांच्या एका कथेवरून घेतलेली ही पटकथा  आहे. पण या चित्रपटात कथाच नाहीय असं काहीं सिनेसमीक्षकांच  म्हणणं असतं . मात्र मला यात अनेक मानवी व्यवहाराच्या  कथा लपलेल्या  दिसल्या.  चित्रपट डेव्हिड आणि टॅंक ट्रक यांच्यातील द्वंद्वावर जरी असला तरी तो सुप्त मानवी मनातील  खुनशी प्रवृत्तीला प्रकर्षाने प्रकट करणारा आहे. 
चित्रपटाचं कथानक थोडक्यात असं की डेव्हिड  ( मध्यमवर्गीय नोकरदार गृहस्थ)कारमधून कॅलिफोर्नियाहून  क्लायन्ट  या ठिकाणी एका मीटिंगला चाललेला असतो. शहर सोडल्यानंतर पुढचा सगळा  रस्ता वाळवंटी वळणदार, डोंगर भागातला सुनसान असतो. 
दरम्यान काहीच वेळात नेहमीसारखं हायवेवर एक  ज्वालाग्राही पदार्थाची वाहतुक करणारा Tank Truck  मंद गतीने चालत असतो , त्याला डेव्हिड ओव्हरटेक करतो.  ( कारने ट्रकला ओव्हरटेक करणं साहजिक आहे ) पुढे जाऊन   ४० टन वजनी दणकट ट्रक   पोलादी आवाज करून कारला ओव्हरटेक करतो... हे पाहून डेव्हिड अचंबित होतो... त्याला हा क्षुल्लकसा प्रकार वाटतो, तो  हसण्यावारी नेतो, आपल्या धुंदीत पुन्हा कार ड्राईव्ह करतो. कधी कार पुढे  कधी ट्रक पुढे हे सुमसाम रखरखीत उन्हाच्या रस्त्यावर चाललेलं असतं... डेव्हिड एकदा हाताने पुढे जा असा ट्रकला इशाराही करतो, ट्रक पुन्हा ओव्हरटेक करतो परंतु एका  क्षुल्लक कारणाने एका भयंकर मनातील  युद्धाला सुरवात झालेली असते... आणि मानवी स्वभावातील  खुन्नस एका जीवघेण्या अपघाताला कारण ठरते. 
आता यातील काही अप्रतिम फ्रेम पाहुयात. जेव्हा त्याच्या कारला ठोकु पाहणार्या ट्रकला हुलकावणी देवुन डेविड एका कैफेमध्ये अर्धमेल्या अवस्थेत येतो . 
व थोड्यात अवधित तिथे तोच ट्रकही येवुन थांबतो. तेव्हा नायकाच्या मनात शिरलेलं संशयाच भुत. डेविडने पेट्रोल पंपावर ट्रक ड्रायव्हरचे फक्त बुट पाहिलेले असतात. तो मग प्रत्येकाचे बुट नजरेनी तपासतो. पुन्हा पाठशिवणीचा खेळ , अजुन एकदा हुलकावणी व ट्रैनच्या भोंग्याच्या आवाजाने दचकुन उठणे.. व स्वतःशीच हसणे.. बोगद्यात अचानक पेटलेल्या ट्रकच्या हेडलाईटने डेव्हिड सोबत प्रेक्षकही थरारतो...  मात्र रस्त्यात अडकलेल्या स्कूलबसला ट्रक मदत करतो तेव्हा डेव्हिडला त्याची टॅंक करुणेने भरून ओसंडताना दिसते. मृत्यूच्या दाढेत सापडलेला डेव्हिड क्षणभर का होईना सुखावतो. पटकथेतला हा प्लॉट आजही इतका वास्तववादी वाटतो कि मानवी व्यवहारातील सुप्त खुनशी मनोवृत्तीला धगधगीत समोर आणतो. खुन्नस या वृत्तीला कुठलाही चेहरा नसतो, ती का निर्माण होते? कधी निर्माण होते? कोणावर निर्माण होते हे काही सांगता येत नाही, हळूहळू ती चेहऱ्या अडून विध्वंसाकडे कधी जाईल हेही सांगता येत नाही. या चित्रपटात ट्रक ड्रायव्हरचा चेहरा मात्र शेवट पर्यंत दिसत नाही. हे डेव्हिड आणि टॅंक ट्रक यांच्यातील द्वंद्वातुन कथाकाराने आणि दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडलं आहे म्हणून हा चित्रपट दमदार वाटतो.चित्रपटाचे कॅमेरा अँगल्स आणि म्युझिक थ्रिल निर्माण करतात. Dennis Weaver यांचा अभिनय सुद्धा कसदार आहे. चित्रपट फॉरमॅटच्या भाषेत स्क्रीनप्लेच्या भाषेत कुठेही तुटत नाही. हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा. लिंक कमेंटमध्ये देतोय.

लेखन - विक्रांत शंके
           दिनेश मोरे
(विशेष आभार - सिनेमा गल्ली फेसबुक समुह )

Comments