मानवाची उत्क्रांती आहे रे - नाही रे वर्गाचा तीव्र संघर्ष आणि आपण सगळेच Parasite ( परजीवी)
मानवाची उत्क्रांती आणि आहे रे - नाही रे वर्गाचा तीव्र संघर्ष आणि आपण सगळेच पॅरासाईट
बॉयॉलॉजीची थिअरी आहे, की एकपेशीय अमिबापासून मग विषाणू, कीटक, सस्तन प्राणी मग माकड आणि त्यातून माणूस... थोडक्यात जनावरांपासून माणसाची उत्क्रांती झाली. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत इतर जनावरांपासून माणसाला वेगळा करणार एक कोणता गुण असेल तर तो म्हणजे विचार करण्याची क्षमता. त्यातूनच मग एकत्र राहण्याची गरज जाणवली आणि समाजाची निर्मिती झाली. पण समाज टिकवण्यासाठी माणूस आणि जनावरांना वेगळा करणारा सळ्यात मोठा दुर्गुण आडवा आला- स्वार्थ, केवळ स्वत:पुरत पाहण्याची वृत्ती! मग त्यावरही पहिला गुण वापरून - 'विचार करून', त्यावर उपाय शोधला गेला - एकत्र जगण्याचे नियम आणि कायदे, त्याला नाव दिलं गेल्या- धर्म! पण इथंही सगळ्यात मोठा दुर्गुण आडवा आला - स्वार्थ! केवळ माझ्या पुरतच नाही तर माझ्या समाजापुरत बघायचं! मग त्यातून निर्माण झाल्या जाती, पंथ, रीती रिवाज, परंपरा - संस्कृती! समाज म्हणून एकत्र राहायची गरज आणि विचार करण्याची क्षमता यातून स्वत: पलीकडे आपल्या परिवाराची, आजू बाजूच्यांची आणि व्यापक प्रमाणावर समजाच्या रक्षणाची परंपरा सुरू झाली! पण पुन्हा स्वार्थ आडवा आला! मी जर रक्षण करतोय तर मग मला आणि त्याही पुढे माझ्या मुला बाळांना पण previleges मिळायला हवीत, असा समज रूढ झाला. मग त्यातून निर्माण झाले क्लासेस - आर्थिक, वर्णाधारित, व्यवसायावर आधारीत... मग बहुदा माणसांप्रमाणेच संस्कृती देखील उत्क्रांत होत गेल्या संस्कृतीमधून निर्माण झाले Social Norms. प्राण जाये पार वचन ना जाये, अात्मसन्माना पेक्षा प्राण गेला तरी बेहतर वगैरे वगैरे...
उत्क्रांतीच्या या प्रक्रियेत हजारो, लाखो वर्ष गेली यात पण मूळ जनावराच्या DNA मधल्या दोन अंत:प्रेरणा मनुष्यात अजूनही टिकुन आहेत - Survival of the fittest आणि Survival Intincts! यातला Survival Intincts संस्कृतीच्या उत्क्रांतीमधून तयार झालेल्या तथाकथित 'माणूस' म्हणून जगण्याच्या सगळ्या कल्पनांना उधळून लावतो! जगण्याच्या प्रतिष्ठेचे कितीही सोशल नॉर्म्स निर्माण झाले तरी ते झुगारून केवळ बासिक गरजांसाठीच टोकाचा संघर्ष करतो. आज संघर्ष करत जगणार्यांची संख्या काही कमी नाही. कदाचित आयुष्यभर असंच संघर्ष करत एक दिवस मराव लागणार आहे हे माहित असूनही यांचा जगण्याचा मोह अजिबातच सुटत नाही. शहरीकरणातल्या सगळ्या प्रश्नांची, मग ती झोपडपट्टी असो की पाणी, वीज, रस्ते अशा सगळ्या नागरी सुविधांवर येणारे ताणाची सगळी जबाबदारी सोयीस्करपणे आपण या लोकांवर टाकून देतो!
मानवाच्या DNA मधली दुसरी अंत:प्रेरणा म्हणजे Survival of the fittest! Survival of the fittest साठी आहे रे वर्गात सुरू असलेल्या संघर्षाला एक glamor आहे, त्यावर चित्रपट बनतात, पुस्तकं लिहिली जातात. पण 'नाही रे' वर्गातील हा संघर्ष हा अजिबातच glamoros नसतो. किंबहुन तो दुर्लक्षितच रहातो. अर्थात दाउद आणि छोटा राजनच्या gang war ला जे glamor आहे ते दोन झोपडपट्टी मधल्या भाईंच्या मरामरीला कुठून येणार! Survival of the fittest साठीचे असे कित्येक संघर्ष एक्या आजू बाजूला सुरू असतात. मग तो माझाच उस साखर कारखान्यात आधी कसा घेतला जाईल या साठीचा संघर्ष असेल किवा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ऑर्डर पूर्ण करता याव्यात म्हणून delivery boys नी केलेला जुगाड असेल!
'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गाच्या या वेगवेगळ्या संस्कृती,सोशल नॉर्म्स वेगवेगळ्या मितीत अस्तित्वात असतात. पण या मितींनी एकमेकांना कधी एकमेकाना छेद दिला तर ? 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गाचे Survival of the fittest आणि Survival Intincts कुठे एकमेकाच्या आड आले तर ? पॅरासाईट
अशाच संघर्षाची कहाणी सांगतो!मानवी इतिहास, त्याचे Basic Instincts, वर्गसंघर्ष, बेगड्या प्रतिष्ठेच्या दिखाउ कल्पना आणि एकंदरीत मानवी आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा इतिहास पॅरासाईट कमालीच्या नेमकेपणाने मांडतो! इतक्या मोठ्या संकल्पना मांडणारी आणि जगातल्या कोणत्याही शहरात आज घडू शकेल अशी आत्यंतिक साधी सोपी गोष्ट अतिशय रंजक पध्दतीने समोर येते. या सगळ्यात मानवी संस्कृतीचे घटक म्हणून आणि माणूस म्हणून वैयक्तिक पातळीवर खूप सारे प्रश्न पॅरासाईट प्रेक्षकांना विचारतो. या प्रश्नांची उत्तर अजिबातच जटील नाहीत पण खूप जास्त खुपणारी नक्कीच आहेत. आणि हीच सोपी उत्तरं आपली संस्कृती, वैचारिक जडणघडण या सगळ्याला मुळापासून हादरवून टाकते.
आता हा सगळा विचार केवळ चित्रपट म्हणून बघितला आणि केला तरी पॅरासाईट कमालीचा रंजक आहे. वर लिहिलेले सगळे मुद्दे दुर्लक्षित केले (किवा यातला कसलाच विचार सुचला नसेल) तरी त्यातला (डार्क) humor entertainment म्हणून देखील खूप वरच्या पातळीचा आहे. चित्रपट म्हणून स्टोरी टेलिंग आणि AV Presentation देखील खूपच वरच्या दर्जाचे आहे.
खूप कमी कलाकृतीत वाचक/प्रेक्षकांच्या वैचारिक क्षमता किवा दृष्टीकोन मुळापासून पासून बदलून टाकण्याची क्षमता असते. Parasite नक्कीच या वर्गात मोडतो!
या चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अतिशय हालवुन टाकणारा आहे.
एकदा ते श्रीमंत कुटुंब फिरायला बाहेर पडल्यावर या गरीब कुटंबाची त्यांच्या आलिशान घरात पार्टी चालू असतानाच अशा काही घटना घडतात की त्या गरीब कुटंबांबरोबर आपणही त्यात गुरफटत जातो. उत्तरार्धात वेगाने घडणाऱ्या घटना आणि अचंबित करणारा शेवट हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य.
खरे वैशिष्ट्य या चित्रपटाचे हे वाटले की केवळ काही साध्या साध्या घटनांमधून आणि निवडक सूचक संवादातून 'आहे रे' आणि 'नाही रे' जगाचे दर्शन आपल्याला घडत राहते. आधी ते वेगवेगळे, स्वतंत्रपणे आपल्या समोर येते पण शेवटी हे दोन्ही जग जेव्हा एकमेकांसमोर ठाकतात तोपर्यंत त्या दोन्ही बाजू प्रेक्षक म्हणून आपल्याला कळलेल्या असतात आणि त्यातली दरी आपल्या मनावर अधिक ठळक आणि गडद होत जाते
. मग दोन्हीतला संघर्ष अटळ ठरतो. शेवटचा काही भाग सोडला तर यातला क्लास डिफरंस subtle आहे. काही मोजक्या शब्दातून, मोजक्या कृतीतून तो दर्शवला जातो पण संवेदनशील प्रेक्षकांपर्यंत तो नक्की पोहचतो. म्हणूनच शेवटी घडणाऱ्या घटना वर वर पाहता अतर्क्य वाटल्या तरी त्यातून वाहणारा अंत:प्रवाह प्रेक्षक समजून घेऊ शकतो.
आजपर्यंत बऱ्याच चित्रपटांतून वर्गभेद, गरिबी-श्रीमंती आणि त्यातली दरी वेगवेगळ्या प्रकारे दाखवली गेली आहे. आपल्याकडेही आर्ट फिल्म व्यतिरिक्त अनेक व्यावसायिक चित्रपटांतून हा विषय हाताळला गेला आहे (उदा, राजकपूर, अमिताभचे बरेचसे प्रसिद्ध चित्रपट).. पण 'लुळी पांगळी श्रीमंती आणि हट्टीकट्टी गरीबी' या ढोबळ वर्गीकरणाच्या पलीकडे जाऊन थोडा विचार केला तर यातले उपप्रकार आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे कष्टसाध्य श्रीमंती, आळशीपणामुळे आलेली गरीबी, गरिबीचे शोषण करुन आलेली श्रीमंती आणि पात्रता असूनही आजची समाजव्यवस्था आणि शोषणातून लादली गेलेली गरीबी.. आणि जेव्हा हे उपप्रकार आपल्याला दिसू लागतात तेव्हा ढोबळ विचारप्रक्रिया सोडून थोडा नेमका विचार आपण करु लागतो.
पॅरासाईट मध्ये गरीबी-श्रीमंती एका समांतर रेषेत चालत असलेली आपल्याला दिसते. या समांतर रेषा जेव्हा एकमेकींना भिडू पाहतात तेव्हा संघर्ष अटळ असतो. पण हा संघर्ष शोषण करणारे आणि शोषित यातला नसून गरीबी आणि तिच्याकडे तटस्थ, असंवेदनशील नजरेने पाहणारे श्रीमंती जग यातला वाटतो. गरीबी मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असतानाही श्रीमंती तिच्यातून येणाऱ्या किळसवाण्या दर्पामुळे नाक मुरडते तेव्हा या असंवेदनशीलतेचा कळस होतो आणि तोच तिच्यासाठी जीवघेणा ठरतो.
रोजच्या खाण्यापिण्याची आणि एकंदर जगण्याची भ्रांत असलेलं एक गरीब किम कुटुंब आणि गरिबीची सावलीही न पाहिलेलं, आपल्या कुटुंबपलीकडील जगाशी पूर्णतः अनभिज्ञ असलेलं एक ऐश्वर्यसंपन्न पाक कुटुंब ही या सिनेमाची पात्ररचना. गरीब कुटुंबाने विविध क्लृप्त्यांद्वारे श्रीमंत कुटुंबात नोकरीसाठी केलेला शिरकाव, त्या श्रीमंताघरच्या आयत्या श्रीमंतीत आपल्या मनात दबलेल्या छानछोकीची पूर्ती करीत असता त्यातही वाटेकरी निघणे आणि त्या वाटेकऱ्या सोबतच्या लढाईत तिन्ही कुटुंबांना जबर किंमत मोजावी लागणे
असा हा विषय आणि त्याची रंजक मांडणी यामध्ये आपण गुंतून गेलेलो असताना आपल्याही नकळत केवळ कोरियाच्याच नव्हे तर संपूर्ण जगातील आहेरे आणि नाहीरे वर्गातील वाढत चाललेल्या दरीबद्दल, आधुनिक जगण्याच्या नादात स्वत्व, मूल्य, सामाजिक जाणीव नष्ट होत चालल्याबद्दल काही प्रसंगातून, काही संवादातून तर काही चित्रचौकटीतून हा सिनेमा असं काही टोकदार भाष्य करतो की त्या रंजकतेच्या स्वप्नातून आपण दचकून जागे होतो.
वरवर पाहता कॉमेडी सिनेमा म्हणून सुरु होणारी कथा पुढेपुढे भयकथा आणि रहस्यकथेची सरमिसळ वाटू लागते आणि सिनेमा संपता संपता एक भेदक सामाजिक आशय मांडणारा सिनेमा पाहिल्याचं समाधान आपल्याला देऊन जाते. सिनेमा पाहताना बऱ्याचदा तर असा विचार येतो कि सिनेमा फास्ट फॉरवर्ड करून एकदाचा त्याचा शेवट बघून घ्यावा म्हणजे सिनेमाभर वाटणारी उत्कंठा आणि त्यापायी छातीची होणारी धडधड तरी थांबेल. आपण जर हा सिनेमा दुसऱ्यांदा पहिला किंवा मनातल्या मनात सिनेमाची उजळणी केली तरच आपल्या लक्षात येते कि या सिनेमाची विषयवस्तू असलेल्या सामाजिक आशयाचे संकेत सुरुवातीपासूनच जागोजागी खुबीने कथानकात पेरलेले आहेत.
त्यातील महत्वाचा संकेत म्हणजे दोन्ही कुटुंबाची घरं. अर्ध जमिनीखाली आणि अर्ध जमिनीवर असलेले किम कुटुंबाचं घर. ज्याच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर दिसतो उघड्यावर लघुशंका करणारा बेवडा. ज्या घरातून धड आभाळही दिसत नाही अशा घरातील माणसांना भविष्याची स्वप्नं पाहायचा तरी अधिकार असावा कि नाही हा प्रश्न किम कुटुंबाचं घर पाहिल्यावर उभा ठाकतो. एकीकडे तळघर हेच किम कुटुंबाचं सर्वस्व आहे. याउलट मोठा चौथरा, आतून बाहेरचं आणि बाहेरून आतलं काहीच दिसणार नाही असं कंपाउंड, लॉन, पोर्च आणि सर्व आधुनिक सुखसोयी असलेल्या पाक कुटुंबाच्या बंगल्याला तळघर आहे (आणि त्यात कुणी राहतंय) हेच त्यांना माहित नाही. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दोन वेगळ्या पातळीवर वावरणारी कुटुंब. एकाला दुसऱ्याकडील श्रीमंतीचा हेवा आहे, भल्याबुऱ्या मार्गाने तशी श्रीमंती मिळविण्याची नुसती इच्छा नव्हे तर हाव आहे. तर दुसऱ्याला आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त काही जग आहे, त्यांच्या काही समस्या आहेत ह्याची कल्पनाही नाही.
पॅरासाईट (बांडगूळ) या नावावरूनच, दुसऱ्या कुणाच्या तरी जीवावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या व्यक्ती किंवा वर्गाविषयीचा हा सिनेमा असणार असा आपण आधीच तर्क केलेला असतो. सिनेमा पाहिल्यावर आपला तर्क बरोबर होता ह्याची तर खात्री होते. पण किम कुटुंब, त्या जुन्या हाऊसकिपरचं कुटुंब आणि पाक कुटुंब यापैकी नक्की पॅरासाईट कोण हा प्रश्न काही आपला पिच्छा सोडत नाही. संधी मिळताच धनाढ्याच्या संपत्तीवर हात मारणारे गरीब जसे पॅरासाईट तसेच गरिबांचा हक्क मारून आपली धन करणारे श्रीमंतही पॅरासाईटच, अडलेल्या कष्टकरी लोकांकडून आपली दैनंदिन कामे वाजवीपेक्षा कमी दराने करून घेणारे मतलबी मध्यमवर्गीयही पॅरासाईटच! इतकेच काय आपल्यापेक्षा गरीब, परिस्थितीने गांजलेली व्यक्ती दिसली की तिचं शोषण करायला मागेपुढे न पाहणारे गरीब देखील पॅरासाईटच!
पॅरासाईटसची संख्या, व्याप्ती आणि व्याख्या व्यक्तिगणिक, परिस्थितीगणिक आणि दृष्टिकोनगणिक बदलत असते, हे रांगडं सत्य कुठलाही अविर्भाव न आणता, कुठलीही मल्लिनाथी न करता, कुठलाही निवाडा न करता आणि कोणत्याही पात्राला पांढऱ्या किंवा काळ्या रंगात न रंगवता त्याच्या रॉ फॉर्म मधे सादर करणारा बॉन्ग जून हो दिग्दर्शित 'पॅरासाईट ' हा कोरियन सिनेमा पाहायलाच हवा.
विक्रांत शंके
संपर्क - 9890766640
(लेखक चित्रपट परीक्षक असुन महाराष्ट्र जीवन मिडीया समुहात कार्यकारी संपादक या पदावर कार्यरत आहेत)


छान लिहिलंय. खास विक्रांत शंके च्या शैलीत. 👍
ReplyDelete