असुरण -2019 रक्त उसळवणारा अनुभव
ASURAN (2019)
"रक्त उसळवणारा अनुभव"
....चंद्राच्या मंद प्रकाशात पाण्यात अचानक पडलेली ती पावलं ज्याप्रमाणे त्या जंगलातून संथ वाहत असलेल्या नदीचा तळ ढवळून काढतात तसाच ती पाहणाऱ्याच्या मनाचाही तळ ढवळून काढतात.. थोडसं अंतर चालून गेल्यावर पाणी छातीला लागते तसा तो अवघडलेला आणि अडखळत चाललेला नुकताच मिसरूड फुटलेला 14-15 वर्ष वयाचा कोवळा पोरगा आपल्या हातातली पिशवी सांभाळत आपल्या बापाला सांगतो ... "मी नको म्हणत होतो, तरी आईने यात बॉम्ब बांधून दिलेत!!!".. अंगावर सर्रकन काटा येतो. बाप लेक पिशव्यांची अदलाबदल करून नदीपात्र ओलांडतात...ज्यांचा पाठलाग मृत्यू करतोय, ते प्रत्यक्ष मृत्यूलाच सोबत घेऊन निघालेत... अशी कोणती पार्श्वभूमी आहे जी त्यांना अशा परिस्थितीत घेऊन आलीय?? पडद्यावरच्या त्या पात्रासोबतच प्रचंड दडपणाखाली आपणही याचा मागोवा घेऊ लागतो....
वडाकुरन नरसिंहा या जमीनदारापासून आपल्या जमिनीच्या छोट्याश्या तुकड्याचे संरक्षण करण्यासाठी सिवासामी, पत्नी आणि दोन तरुण मुलं यांचा संघर्ष आणि या संघर्षाच्या पायात जीव मुठीत घेऊन पळण्याची या कुटुंबावर आलेली वेळ याभोवती 'असुरन' चित्रपटाचे कथानक फिरते.
तामिळनाडूच्या नागपट्टणम जिल्ह्यातील 1968 साली झालेल्या किल्व्हेनमनी या गावातील निर्घृण जळीतकांडाने प्रभावित झालेला हा चित्रपट 'पुमानी' या प्रसिद्ध लेखकाच्या 'वेक्कई' या कादंबरीवर आधारित आहे. जमीनदार आणि त्याच्या 200 गुंडांनी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी कायदेशीर लढा देत असलेल्या काही दलित शेतकरी कुटुंबाच्या घरांना रात्रीच्या वेळी आग लावली होती. आगीतून वाचून जीवाचा आक्रोश करत कोणी बाहेर पडला तर त्याच्यावर हत्याराने सपासप वार करून त्याला पुन्हा त्या आगीत लोटलं जात होतं... अगदी 4-2 वर्षाची लेकरं सुद्धा त्या हल्ल्यातून वाचली नाहीत.. तब्बल 44 निष्पाप जीवांचा बळी घेणारं हे निर्घृण जळीतकांड होतं, जे या चित्रपटात हुबेहूब दाखवलं गेलं आहे.
देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतुन मुक्त झाला असला तरी राजेराजवाडे यांच्या काळापासून चालत आलेली आणि इंग्रजानी दृढ केलेली जमीनदारी पद्धत यातून जमीनदार आणि सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी यांच्यातला रक्तरंजित वर्गसंघर्ष देशाने स्वातंत्र्यानंतरही तीन-चार दशकं पाहिला आहे. जमीनदार आणि कुळ शेतकरी यांच्यातला हाच वर्गसंघर्ष पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि अगदी महाराष्ट्राच्याही काही भागात साम्यवादाच्या (Communism) उदयाला कारणीभूत ठरला. जमीन सुधारणा कायदे प्रभावीपणे अमलात येईपर्यंत या भागांमध्ये साम्यवादी चळवळ सुरूच होती.
वेत्रीमारन दिग्दर्शित 'असुरन' 1960 ते 1980 या दोन दशकांचा काळ उभा करतो. सिवासामीचा या जमीनदारी व्यवस्थेविरुद्धचा रोमांचकारी प्रवास चित्रपटात दाखवला गेला आहे आणि सिवासामी हे पात्र साकारलं आहे धनुषने ...
एकाच वेळी निरागसता आणि क्रूरता, सोशिकपणा आणि आक्रमकपणा यांचा अद्भुत संगम म्हणजे धनुष. प्रेक्षकांच्या इतका सहज काळजाला भिडणारा दुसरा कोणी अभिनेता नसावा. बायको आणि लेकरांच्या चुकीसाठी पंचायतीच्या निर्णयाप्रमाणे जेंव्हा धनुष वडकुरनच्या वस्तीत अगदी लहानापासून मोठ्याच्या लोटांगण घालून पाया पडत जातो तेंव्हा आपण हळहळतो, त्यात तो धनुषचा काळीज चिरणारा करुण आवाज आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणतो.
मात्र आपलं कुटुंब, छोटासा समाज, छोटंसं विश्व जेंव्हा जळीतकांडाचं शिकार होतं तेंव्हा मात्र याच सिवासामीतला असुर जागा झालेला आपण पाहतो. विश्वनाथन ह्या जमीनदारावर कोयत्याने वार करतो तेंव्हा त्याच्या डोळ्यातील आग, चेहऱ्यावरचा राग धडकी भरवणारा आणि अंगावर शहारे आणणारा आहे. कधीतरी भविष्यात धनुष स्वतंत्र खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळू शकतो. तशा कलाकृतीसाठी धनुषची मी नक्की वाट पाहत आहे. पडद्यावर जेंव्हा आपण कलाकाराला त्याच्या नावापेक्षा पात्रावरून ओळखतो तेंव्हा कलाकाराने त्या पात्राला पूर्ण न्याय दिलेला असतो. 'असुरन' मधला धीरगंभीर, चाळीशीतला, कुटुंबाच्या भल्यासाठी झटणारा 'सिवासामी' हा धनुषच्या आतापर्यंतच्या आपण बघितलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळा आहे. हा किरकोळ शरीरयष्टीचा धनुष जेव्हा शत्रूवर तुटून पडतो तेंव्हा तो एखाद्या उल्कापातापेक्षा कमी वाटत नाही. आपला बाप बेवडा आहे, त्याच्यात दम नाही, हिंमत नाही आणि स्वाभिमान तर बिल्कुलच नाही असा समज झालेला चिदंबरम जेंव्हा त्याचे हे अक्राळविक्राळ रूप बघतो तेंव्हा तो ही थक्क होऊन जातो.
चित्रपटामधले इतर सर्वच कलाकार धनुषच्याच ताकदीचे आहेत. सिवासामीची पत्नी पचाईमल हिची भूमिका करणारी मंजू वारीयर हीचा असुरन हा पहिलाच तामिळ चित्रपट आहे यावर आपला विश्वास बसणार नाही. सिवासामीचा थोरला मुलगा वेलमुरुगन याची भूमिका करणारा टिजे अरुणासलम हा एक British Gentleman आहे ह्यावरही आपला विश्वास बसणार नाही. जन्मापासून तारुण्यापर्यंत इंग्लंड मध्ये वाढलेल्या टीजे ने आपल्या तामिळ मातृभाषा आणि मातृभूमीपासून कधीही अंतर ठेवलं नाही. संगीत कलाकार म्हणून नावारूपाला येत असलेल्या या कलाकाराने असुरनमध्ये मात्र सगळ्याचच मन जिंकलय. वेलमुरुगन आणि सिवासामी अशी दुहेरी भूमिका धनुषने करावी अशी मुळ योजना होती, पण धनुष त्याच्या 'पट्टास' या आगामी चित्रपटातही दुहेरी भूमिका करणार असल्याने आणि तो असुरन साठी जास्त वेळ देऊ शकत नसल्याने वेलमुरुगनची भूमिका टी जे च्या वाट्याला आली, जी त्याने भक्तिभावे निभावली आहे. केन करुणासची चिदंबरम भूमिका विशेष लक्षवेधी आहे. एका वायरच्या पिशवीत तो नेहमीच आपल्या संरक्षणासाठी गावठी हातबॉम्ब बाळगत असतो.
या चित्रपटातली या सर्व कलाकारांची एक कुटुंब साकारत असतानाची जी chemistry आहे ती वर्णनापलीकडची आहे. हे एक खरंखुरं कुटुंब वाटतं इतकं ते जिवंत केलं गेलं आहे. चित्रपटनिर्मितीशी संबंधित असलेल्यांसाठी हा एक खूप चांगला अभ्यास विषय आहे. जेंव्हा या कुटुंबावर अन्याय होतो आणि प्रत्येकजण आपापल्या परीने अन्यायाचा प्रतिकार करतो, त्या प्रत्येक पात्रासोबत आपणही अन्याय करणाऱ्यावर दातओठ खाऊ लागतो.
प्रथितयश तामिळ दिग्दर्शक बालाजी सक्तीवेल, ज्यांनी मागच्या 20 वर्षात अनेक चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे , त्यांनीही असुरन चित्रपटातुन अभिनयात पदार्पण केले आहे. त्यांनी साकारलेला जाडजूड शरीरयष्टीचा, पल्लेदार मिशाचा झुपका असणारा इन्स्पेक्टर ब्रिटिशकालीन जुलमी पोलीस अधिकाऱ्याची आठवण करून देतो. अभिनेते प्रकाश राज यांच्याबद्दल काय बोलावं. अगदी क्षणभराचीही भूमिका मिळाली तरी तिचे सोने करणारा हा माणूस कोणत्या मातीचा बनलाय हे मला आजपर्यंत पडलेलं कोडं आहे. त्यांचा असुरन मधला वकील वेणूगोपाल शास्त्री प्रचंड छाप पाडून जाणारा आहे. पशुपथी,पवन यांच्यासारखेही कसलेले कलाकार चित्रपटात आहेत.
Cinematography आणि संगीत या आघड्यावरही चित्रपट भरपूर लक्षवेधी आहे. Action ने पुरेपूर भरलेला हा सिनेमा छायाचित्रण आणि संगीताच्या जोरावर क्षणाक्षणाला थरार वाढवणारा आहे. धनुषच्या एन्ट्रीचे संगीत चित्रपट संपल्यावरही आपल्या मस्तकात घुमत राहते. Cinematography वेलराज यांची आहे तर संगीत G V Prakash Kumar यांचे आहे. 1960 ते 1980 चा काळ आणि खरेखुरे ग्रामीण जीवन पडद्यावर उभे करताना वेलराजचे सगळे कौशल्य पणाला लागले आहे. विशेषकरून रात्रीचे आणि खेड्यातील दृष्य चित्रित करताना कॅमेऱ्यात रंगसंगती आणि प्रकाशाचे देखणे मिश्रण तयार केले आहे. शहीद : 23 मार्च 1931, फिर हेरा फेरी, 3 आणि अगदी अलीकडच्या वडा चेन्नई सारख्या चित्रपटांच्या सुरेख छायाचित्रणासाठी आपण वेलराज यांना ओळखतोच.
राजकीय खेळात आपली मुळ philosophy हरवून बसलेला, अनेकदा मुळ उद्देशापासून भरकटत गेलेला साम्यवाद आपण अनुभवला असेल पण खरा साम्यवाद काय असू शकतो, किंवा कसा असायला पाहिजे याचे उत्तम उदाहरण 'असुरन' घालून देतो. वर्गसंघर्षातून निर्माण झालेल्या भांडवलवादी भस्मासुराचा अंत करण्यासाठी "असुरन"ला जन्म घ्यावाच लागतो. म्हणूनच असुरन हा भांडवलशाही वर्गव्यवस्थेविरुद्ध आपल्या धमन्यातले रक्त उसळवणारा अनुभव ठरतो.
चित्रपटाचा तेलुगू रिमेक व्यंकटेश यांना घेऊन होऊ घातला आहे, पुढे मागे हिंदीतही चित्रपटाचा रिमेक येऊ शकतो. 'असुरन' चा Chinese Remake सुद्धा प्रस्तावित होता, पण निर्माते Kalaipulli S. Thanu यांनी त्याला नकार दिला आहे. चीन साम्यवादाचा पुरस्कार करणारा देश असला तरी 'असुरन' हा दक्षिण भारतातल्या लोकजीवनाशी आणि इथल्या सामाजिक परिस्थितीशी जुळणारा विषय असल्याने त्याचा चिनी रिमेक होऊ नये असे त्यांचे स्पष्ट मत आहे. मला हा चित्रपट माझे परममित्र महेश गुंड यांनी पाठवला. तुम्हांलाही पहायचा असे तर हा you tube वर उपलब्ध आहे.
#चित्रपट परीक्षण
#asurandhanush
- विक्रांत शंके
( लेखक चित्रपट समीक्षक असुन महाराष्ट्र जीवन मिडीया समुहात कार्यरत आहेत )


Comments
Post a Comment