Room -2015 आई आणि मुलाच्या हळव्या नात्याची कहाणी

"  People sometimes talk about bestial cruelty of man, but that is terribly unjust and offensive to beasts or animals, because no animal could ever be so cruel as a man, so artfully so artistically cruel " -Fyodor Dostoevsky.

एखादया क्रूर माणसाबद्दल बोलताना, तो एखादया श्वापदासारखा क्रूर होता असं आपण सहज म्हणतो, पण माणसा इतके क्रौर्य कोणत्याही श्वापदामध्ये नसते.
असाच एक क्रूर माणूस जॉय या शाळकरी मुलीला पत्ता विचारायच्या निमित्ताने जवळ बोलावतो, तिला kidnap करतो आणि अनेक वर्षे तिला एका साधारण 12 बाय 12 च्या Room मध्ये ठेवतो. या खोलीला एकही खिडकी नसते, फक्त एक skylight असतो. या बंदिवासात तो वारंवार तिच्यावर बलात्कार करतो. त्याच्यापासून तिला झालेल्या बाळाला ती कशी वाढवते आणि त्याच्या सुटकेचा प्लॅन कसा रचते, त्याची हृदयद्रावक गोष्ट आहे Room या 2015 च्या सिनेमामध्ये. 
आई आणि मुलाचं नात अगदी जगावेगळ असत. म्हणजे मुल जन्मल्यानंतर ते पुरेस मोठ होईपर्यंत आईच त्याची पहिली गुरू, शाळा सर्वकाही असते. या चित्रपटात 5 वर्षाचा जैक आणि त्याची आई 8 वर्षापासुन एका खोलीत बंद असतात. खरतर त्याच्या वडिलाने त्या दोघांना कैद केलेल असत
या सिनेमातील जॉयच्या मुख्य भूमिकेसाठी ब्रि लार्सन हिला ऑस्कर आणि BAFTA सह अनेक पुरस्कार मिळाले. यातील तिच्या मुलाची जॅकची भूमिका करणारा बालकलाकार जेकब ट्रेम्बले याच्या कामाचेसुद्धा खूप कौतुक झाले.
वडिलानीच एका छोट्या खोलीत कैद केल्यावर. जॅकला आहे त्या परिस्थितीत चांगल्या रितीने वाढवण्यासाठी त्याची 'मा' जॉय तिच्या परीने सर्व प्रयत्न करत असते. त्यांचा ठरलेला दिनक्रम असतो. घरातल्या सगळ्या वस्तुंना गुड मॉर्निंग म्हणून तो सुरू होत असतो, गुड मॉर्निंग tv, गुड मॉर्निंग sink ई. मग नाष्टा, थोडया वेळाने व्यायाम, ठराविक वेळ टीव्ही बघणे, अभ्यास, रात्री झोपताना गोष्ट असे सगळे शिस्तीत आणि प्रेमानेसुद्धा चालत असते. आपल्या रूमच्या बाहेर आणखी काही जग आहे याची जॅकला कल्पनाच नसते. रूममधील आपले अस्तित्व आणि टीव्हीमधिल जग हे दोनच त्याला माहित असतात. जॅकची झोपायची जागा म्हणजे खोलीतील कपाटाच्या एक कप्प्यात असते.ओल्ड निक रूममध्ये येण्यापूर्वीच मा त्याला झोपवत असते. ओल्ड निकचा आणि जॅकचा संपर्क येणे ती शक्यतो टाळत असते. ओल्ड निक त्यांना नुसते कोंडूनच ठेवत नाही तर त्यांना खूप काटकसरीने राहायला लावतो. 

एक रात्री खोलीत ओल्ड निक असताना जॅक कपाटातून बाहेर पडून बेडजवळ जाऊन त्याला कुतूहलाने निरखून बघत असतो. त्याच वेळी ओल्ड निक जागा होतो. जॉयला वाटते ओल्ड निक आता जॅकला काहितरी अपाय करेल म्हणून ती त्याच्यावर हल्ला चढवते. पण ओल्ड निक तिला सहजासहजी जायबंदी करतो. दुसऱ्या दिवशी दोघांना शिक्षा म्हणून तो खोलीतली वीज 24 तासांसाठी बंद ठेवतो. जॅक आणि  जॉयची गारठून वाईट अवस्था होते. 
हा अनुभव आणि ओल्ड निकची नोकरी जाणे यामुळे जॉय निर्धार करते की जॅकला कसेही करून रुमबाहेर काढायचे कारण ओल्ड निक तिला सांगतो की तिच्यावर आणि जॅकवर केल्या जाणाऱ्या खर्चात तो अजून कपात करणार आहे.  ती त्याला आता हळूहळू रूमबाहेरच्या खऱ्या जगाची माहिती दयायला लागते. जॅकला रूममधील जग आणि टीव्ही मधील जग एवढेच माहिती असल्याने तो खूप गोंधळतो आणि आईवर चिडचीड करायला लागतो. एका रात्री ओल्ड निक यायच्या आधी जॉय जॅकला गरम पाण्यात भिजवलेले टॉवेल्स गुंडाळून त्याचे अंग गरम करून जॅकला खूप ताप आल्याची बतावणी ओल्ड निकजवळ करते आणि त्याला आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असा हट्ट धरते. ओल्ड निक तिला अजिबात भीक घालत नाही आणि दुसऱ्या दिवशी जॅकसाठी अँटिबायोटिक आणेन असं सांगतो. दुसऱ्या दिवशी ती जॅकला कार्पेटमध्ये पुन्हा पुन्हा गुंडाळून कार्पेट स्वतःच उलगडून जॅकने त्यातून बाहेर कसं पडायचं त्याचा सराव करून घेते. त्या रात्री ओल्ड निक आल्यावर ती जॅक मरण पावला म्हणून मोठमोठ्याने रडू लागते आणि जॅकच्या मरण्याचा त्याला बोल लावते.जॅकला तिने छोट्या कार्पेटमध्ये गुंडाळून ठेवलेले असते. ओल्ड निक जॅकला घेऊन कार्पेटची गुंडाळी त्याच्या पिकअप ट्रकमध्ये मागच्या बाजूला टाकतो. आईने शिकवल्याप्रमाणे जॅक त्यातून स्वतःची सुटका करून घेतो आणि सिग्नलला गाडी थांबल्यावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. ओल्ड निकसुद्धा गाडीतून उतरतो. पण कुत्र्याला फिरवायला नेणारा एक माणूस जॅकची मदत करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. ओल्ड निक तिथून पळून जातो. प्रचंड घाबरलेल्या जॅकला एक हुशार महिला अधिकारी बोलता करते आणि त्याच्या बोलण्यावरून रूमचा शोध लावून जॉयची सुद्धा सुटका करते.

पोलिस जॅक आणि जॉयला हॉस्पिटलमध्ये भरती करतात. त्यांच्या सुटकेची बातमी कळताच जायचे आई-वडिल तिला भेटायला, घरी न्यायला येतात. पण एव्हाना त्यांचा घटस्फोट झालेला असतो. हॉस्पिटलमधून दोघांना तिच्या आईच्या आणि आईच्या मित्राच्या घरी नेले जाते. जगाशी जॅकची कशी ओळख होते, तो कसा अडजस्ट करतो हे पाहण्यासारखे आहे. जॉयचे वडिल जॅकचे अस्तित्वच नाकारत असतात, त्याच्याकडे बघायचेसुद्धा टाळत असतात. जॉय त्यांना परत कधीच न भेटायला सांगते. एकीकडे जॅक नवनवीन गोष्टी शिकत असतो, तर दुसरीकडे जॉय इतकी वर्षे स्वतःला आणि छोट्या मुलाला सावरल्यानंतर डिप्रेशन मध्ये जाते. मला तू विसरून गेलीस, नवीन relationship सुरू केलीस असे ती स्वतःच्या आईवर आरोप करते. तिची मुलाखत घ्यायला आलेल्या टीव्ही चॅनेलच्या मुलाखतकर्तीच्या काही प्रश्नांनी ती घायाळ होते. 
इथ मला जैकोब ट्रैम्बलीनचा अभिनय खुपच भावुन गेला. लहान मुलाच भावविश्व त्यान अगदी हुबेहुब पडद्यावर साकारल आहे.आणि खासकरून त्याची स्वगत .जस की तो म्हणतो , अंडेसाप हा घरातला सर्वात मोठा प्राणी आहे , आणि TV मधुन old nick खायला आणतो. जेव्हा तो बाहेरच्या जगात येतो तेव्हा म्हणतो की हे जग खुपच मोठ आहे. इथ सतत काही न काही घडतच असत. इथ वेळ पातळ आहे पावावर ओतलेल्या लोण्यासारखी म्हणुन सगळे चल आटप लवकर पटपट कर म्हणत असतात.आता  या जगात मी आणि आई राहणार आहोत मरेपर्यंत इ इ .लहान मुलाच्या धारणा आणि त्याच मर्दादित भावविश्व आपल्या अप्रतिम अभिनयातुन जैक अधोरेखीत करतो.  अगदी संपन्न करणारा हा अनुभव आहे. आता 
जॉयच्या आणि जॅकच्या आयुष्याची घडी परत कशी बसते, दोघे room ला विसरतात का, हे पाहण्यासाठी जरूर पहा Room.

#Room -2015 
#BrieLarson
#JacobTremblay
                            - Vikrant Shanke 

Comments

Post a Comment