पटेली - : समकालीन विश्वात पूर्वसुरींचा आधार घेत मध्यमवर्गीय जाणिवांचा व्यापक सांस्कृतीक पट मांडणारी कादंबरी


अविनाश उषा वसंत लिखीत पटेली ही कादंबरी सध्या बरीच चर्चेत आहे. कादंबरी लेखनातील नवा प्रयोग म्हणुनही समीक्षक वर्तुळात त्याकड पाहिल जात आहे. आता या कादंबरीबद्दल टिपीकल स्टिरियोटाईप समीक्षा न लिहीता मी सुद्धा वेगळ्या धाटणीने समीक्षा लिहीणार आहे.  तर सुरूवात करूया समुद्रापासुन .समुद्र हे पटेली कादंबरीतल पात्र आहे . अभिजन अंगाने नायक तुमच्या माझ्या भाषेत हीरो. समुद्र हे नावच त्या पात्राच्या जीवनाचा व विचाराचा कैओस अमर्याद स्वरूपात दाखवण्यास पुरेस ठरत. समुद्राच प्रतिक रूपक म्हणुन लेखकानी भारी वापरल आहे. तर हा समुद्र काय करतो.? तर जस खरा समुद्र  समुद्राकिनारी येणार्या प्रत्येक माणसाच प्रतिनिधीत्व करतो. तसाच हा सुद्धा प्रत्येक भारतीय पुरूषाच प्रतिनिधीत्व करतो. यात याने  मध्यमवर्गीय बहुजन पुरूषाचा देह धारण केलाय आणि ग्लोबल पुरुषाचा चेहरा. आणि याच्या डोक्यातील मेंदु मात्र Identity Crisis मध्ये आहे.  ही संज्ञा ओबामांच्या Dreams from my father मध्ये पहिल्यांदा वाचलेली. समुद्र हा महानगरी मध्यवर्गीय चाळीत राहणारा गिरण कामगाराचा  मुलगा आहे. चाळीतल्या खोलीत राहुन इंजिनियर होतो. पण तसाच हा गावाकडची नाळही राखुन आहे. याला सोडुन इतर सगळेच कुटुंबीय गावामध्ये वास्तव्यास आहेत. चाळीचा विषय निघालाच आहे तर कादंबरीत समकालातली चाळ लेखकानी चांगलीच जीवंत केलीय. तश्या मुंबईच्या चाळी आपल्याला चित्रपट, महानगरिय छापाच्या कादंबर्यातुन भेटतच आल्या आहेत. तरी या कादंबरीत तुम्हांला नष्ट होत जाणार्या रिडेव्हलपमेंटच्या स्टोन क्रशरमध्ये शेवटच्या घटका मोजणारी चाळ भेटेल. आता चाळीबद्दल आधिकच न सांगता पुढे जातो . परत नायकाकड वळुयात व स्टोरीचा प्लॉट थोडक्यात समजुन घेवु. 
तर हा समुद्र एका ऊर्जा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ही त्याची प्रौढ़ मैत्रीण हेमा तिची मुलगी  गजलची मैत्रीण आणि 
समुद्रची प्रेयसी ऊर्जा.पटवापटवीच्या बर्याच उपद्व्यापानंतर याला ती पटते तो ऊर्जेशी लग्नही करतो. ऊर्जा चाळीत रहायला येते. अवघा सुखाची संसार. नाही हे त्या दगडी चाळ सारख्या चित्रपटाचं कथानक नाहीय. मन धागा धागा-  जोडते रे नवा . ऊर्जा समुद्रशी लग्न करते.काही वर्ष ते सोबत राहतात. ऊर्जा आणि समुद्रला बाळही होणार असत पण अचानक ऊर्जा एबॉर्शनचा निर्णय घेते. ती टोकाची करियरिस्ट झालेली असते.या निर्णयाने दोघांचा ब्रेकअप होतो. समुद्र आता प्रेम ,लग्न या चक्रात चांगलाच पिसला गेलेला असतो. ब्रेकअपचा वार त्याच्या जिव्हारी लागतो आणि मग तो स्व:च्या  शोधात भटकायला लागतो... आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट होईल का ? यासाठीही तडफडत असतो शेवटी चाळीच्या भल्यासाठी देवाला गार्हाणे (देवाकडे मागितलेल दान) घालताना म्हणतो,  " जगातल शोषण संपु दे, समानता नांदु दे रे,  ज्यांचे कोणाचे बायको, मैत्रीणी मित्रांबरोबर भांडण असेल ते पण मिटु दे जागेवल्या म्हाराजा " पृष्ठ क्र. 196 . वाचकाची समुद्रबरोबर सुरू असलेली भटकंती थांबते.आणि वाचक विचार करायला लागतो समुद्रपेक्षाही भयंकर विचार
कदाचित समुद्रच्याच ठिकाणी जावुन.
 पटेलीच पहिल वैशिष्ट हे की ती, मुंबईची सैर करवतेच पण विचार करायलाही भाग पाडते. कादंबरीचं कथानक समुद्रचं बालपण, शिक्षण, करियर,चाळीतलं आयुष्य गावाकडच्या आठवणी, गजलेशी मैत्री ,ऊर्जेसोबतच प्रेम, लग्न ,त्याच बेबंद उध्वस्त जीवन व सखोल चिंतन इ भोवती फिरत राहत. यात लेखकाने पात्राच्या माध्यमातुन समकालीन पिढीच्या आयुष्यातला कोलाहल मांडलाय. मराठी समीक्षेत कवितेला कवीच्या भावनांच थेट प्रक्षेपण असत म्हणुन कवीच्या व्यक्तीमत्वाशी जवळीक साधणारा वाडःमय प्रकार मानला आहे. ढोबळमानाने प्रत्येक साहित्य ही लेखकाची स्व : अभिव्यक्तीच असते. तुमच्या जाणीवा , नेणीवा, धारणा, सामाजिक परिवेश याच प्रतिबिंब यात उमटतच असत . पण पटेली ही कवीतेच्या समीक्षेला अपवाद ठरते . कोसलासारखी. यात लेखकाचे स्वानुभव मांडलेत इतपत हिच्यातले संदर्भ जिवंत भासतात नव्हे आहेत. तर समकालीन पिढीच्या आयुष्यातला कोलाहल मांडण्यासोबतच लेखकाने स्व : च्या ब्रेनमधील कैओसही मोठ्या ताकदीने व प्रभावीपणे मांडला आहे. आणि हीच असते खर्या अर्थाने एक सशक्त अभिव्यक्ति. कादंबरीच्या पहिल्या पानापासुन लोकल टु ग्लोबल संदर्भाना सुरूवात होते. यात मायकल जैक्सनच्या गाण्यापासुन ते ग्रेसच्या कवीता पुण्याचा 4 फुटी गणपती , प्लेटो, ऐरिस्टॉटल, इ बाबतचे. व्यापक संदर्भ आले आहेत. पुढे पुढे कादंबरीभर तुम्हांला विविध खेळाशी निगडीत संकल्पना, नियम, इ चेही संदर्भ मिळतील, यात कैरम, क्रिकेट तीन पत्ती ,चेस  हे आल तसेच  संगीत, चित्रपट नाटक ,अभंग , कविता , साहित्य, राजकारण, समाजकारण तत्वज्ञान, भाषा , चळवळ,  संतपरंपरा, सुफी परंपरा,  अध्यात्म , मानसशास्र वेगवेगळे, इझम, सिद्धांत, गणितीय प्रमेय इ. यावरून लेखकाच्या वाचनाचा व चिंतनाचा आवाका समजतो. पटेलीच अजुन एक वैशिष्ट जे यामागच्या कुठल्याच कादंबरीत आल नसणार ते म्हणजे फेसबुकचा संदर्भ. तुमच्या माझ्या आणि बहुतांशी लोकांच्यी जगण्यात फेसबुक किती सहजतेने सामावुन गेलय मात्र कुणी आजवर यावर लिहायला धजल नाही. पटेली मध्ये फेसबुकच नायकाच्या जीवनातल स्थान विषद केलय. फेसबुकसोबतच कादंबरीत येतात तंत्रद्यानी संद्या ( Technical Term)  जस की अल्गोरिदम,  कोडिंग, सॉफ्टवेयर इ इ. तुम्ही वाचु शकता कादंबरीतल एक वाक्य जगाचच भाषिक सत्य मोठ्या दिमाखाने सांगुन जात . जेव्हा नायक आपल्या कार्पोरेट कलीगना भाषेबाबतचा अभिजनवाद एक वर्णद्वेष आहे म्हणुन सांगत असतो तेव्हा तो म्हणतो " नवीन शोध ही भाषेची निर्मिती असते. शोध ज्या भाषिकाकडुन लावला जातो तसाच शब्द सर्व ठिकाणी रूढ होतो. भाषा ही वैयक्तिक मालकी नसुन समुहाची मालकी आहे " पृष्ठ क्र. 47 यात भाषेच्या अभिजनवादाबरोबरच कल्चरल हेजीमनी आणि नेमाडेंनी मांडलेल्या देशीवादातील वसाहतवादी भाषिक आक्रमण व स्वीकारण संकल्पनेचीही आपसुक उजळणी होते. आता वळुयात कादंबरीतील जातप्रश्नाकड. जातप्रश्न हा अनेक अर्थानी भारतीयाच्या जिव्हाळ्याच्या विषय. कुणाला जात जोपासायचीय, काहीना तिचा अंत हवाय तर काही जिंदगीच नाव लवडा ठेवुन खुशाल जगणारे खुशालचेेंडु आमच्या जीवनात जात मैटरच करत नाही म्हणुन डिंगे हाणतात. सपक जगतात.समुद्रला जात तोडायचीय पण  सम्याच्या जगण्यात मात्र याच जातीन आपली जात दाखवलीय ऊर्जेपासुन विभक्तीच कारण जात बनलीय. समुद्र माळी तर ऊर्जा ब्राम्हण. पण इथं पारंपारिक जातीवाद नाही तु माळी मी ब्राह्मण हो दुर. नाही तर हजारो वर्षापासुन बहुजन आणि भारतीय नेणीवमध्ये रूजलेल्या लपलेला जातीय धारणांचा अर्क आहे. तो बहुजन आणि ब्राम्हणी या आशयाचा सरळ अंगावर येवुन विद्रोहाची भाषा करणार्या भीमसेन देठेंच्या इस्कोट मधल्या सारखा नाही तर सौम्य स्वरूपाचा लक्षातच न येणारा स्लो पॉयजन सारखा पण प्रभाव पाडणारा आहे. ज्या वरवर पाहता तुमच्या लक्षात येणार नाही. पण हे नाकारता येत नाही की  ऊर्जेचे करियरिस्ट होणं व ऐबोर्शनचा निर्णय घेणं याच मुळ तिच्या जातीत लपल्याचं दिसत. ऊर्जेच्या ठिकाणी जर बहुजन स्री असती तर नवर्याला सोडुन लेकरू पाडुन करियर फोकस केल नसत कधी तीने. याचा अर्थ बहुजन स्रियांनी व्यक्तीस्वातंत्र्य जोपासु नये किंवा लग्नानंतर करियर फोकस करू नये असा नाही तर टोकाच आत्मकेंद्रिकरण म्हणजे लेखकाच्या भाषेत फेसबुकचा अल्गोरिदम हा ऊर्जेचा ब्राम्हणी घरात नांगी टाकुन पाळला गेला होता लहानपणापासुन. वेळ येताच तो वर आला. जात इथ मैटर करते. ऊर्जा ब्राम्हण कुंटुंबात जन्मली म्हणुन हजारो वर्षापासुन ज्ञानाच्या सगळ्या किल्ल्या यांच्याच हातात आणि म्हणुन बदलत्या जगाचप्रमाणे बदल करण्याची जाणही यांच्यातच .म्हणुन ऊर्जा करियरिस्ट झाली. सुधांशुला जवळ करायची. पॉवर पॉलिटिक्स खेळायची. एखादी बहुजन मुलगी हे करू शकली नसती. ती फैमिलिस्ट झाली असती. रोज रात्रीच जेवण बनवल असत तिने समुद्रची वाट बघत आयुष्यभर. पण ब्राम्हणी ऊर्जेन समुद्रला खोटी स्वप्न दाखवली. चाळीच्या कॉमन संडासात हागणार आयुष्यभर म्हणणारी ऊर्जा लग्नानंतर या 10 बाय 10 मध्ये माझ बाळ जन्माला घालणार नाही बोलली. सबसे खतरनाक झुठे सपने दिखाना होता है.
आता वळुयात कादंबरीतील वर्गवादाकडं.  पटेलीतला नायक बराचसा पुरोगामी वाटत असला तरी तो डाव्यांबद्दल आदर ठेवुन आहे. जगातल शोषण संपाव अशी त्याची इच्छा आहे. मुंबईच डाव्यांच राज्य येत नाही कारण ते जात जोपासतात म्हणुन तो तळमळतो, डाव्यांच्या पराभवाची अनेक कारण सांगतो . गिरणीसंपात उद्भवस्त झालेल्या कामगारांबद्दल, त्याच्या पिढीच्या बरबादीबद्दल हळहळतो .चाळीच्या रिडेव्हलपमेंटची त्याला भीती वाटते, फेसबुकचा अल्गोरिदम घातक वाटतो कारण या दोन्ही तुमच्या माझ्यातील सर्जनशील अवकाश काढुन घेत आहेत. जगण बेचव, आभासी आणि अधांतरी होत चाललय. चुलता पैश्याबद्दल विचारतो तेव्हा सम्या सांगतो," फुकट पैसा न्हाई मिळत त्यात्या, गांड भरून काम घेतात " म्हणजे स्वरूप बदलेले कामगार स्वरूप बदलेलली शोषणव्यवस्था पण व्यवस्था तीच. दिल्लीहुन येताना रेल्वेच्या रूळावर गु काढणारा श्रमिक नायकाला अस्वस्थ करतो. मी टायटलमध्ये मध्यमवर्गीय जाणीवांचा व्यापक पट मांडणारी कादंबरी म्हटलय याचही थोडस विश्लेषण व्हाव.पटेलीतला नायक हा एकाचवेळी लोकल आहे ग्लोबल आहे , शहरी आहे ग्रामीण आहे. कष्टकरी होता ऐतखावुही आहे. ही सगळी भारतातल्या  मध्यमवर्गाची लक्षण. मध्यमवर्गीय जगण्याची मुल्यव्यवस्था वेगळीच असते तो एकाचवेळी कष्टकरी श्रमिकांच भल करू पाहतो तर दुसर्या बाजुने व्यवस्थेकडुन पिळला जातो.जगातले सगळे इझम समजुन घेवुन त्यातील सैद्धांतिक मांडणीला घेवुन  भेजाचा कीस पाडणारी जमात हीच.म्हणुन आजपर्यंत जगात सगळ्या क्रांत्या मध्यमवर्गीय माणसानेच केल्या. रूसो, वाल्तेअर पासुन हिटलर गांधीपर्यंत .
पटेलीतला समुद्र हे सगऴ पावलोपावली करतो.सोबत पुर्वसुरींनाही सोडत नाही तुकाराम , एकनाथ , आंबेडकर इ इ सोबत घेवुन चालतो.
निवेदन शैलीत मात्र कादंबरी तोंडावर पडलीय अस वाटत, कारण पटेलीच्या उत्तरार्धात समुद्र एके समुद्र आणि त्याच असंबद्ध चिंतन हे वाचकाची धावपळ करत आणि आपण कादंबरी वाचत नसुन विषमी व्यवस्थांवर बोट ठेवणार सटायर किंवा प्रोजटाईप वा असलच तत्सम वाचत असल्याचा भास होतो. कादंबरीतल्या इतर पात्राला समुद्रच्या तुलनेत कमी एक्सपोजर मिळत.अलबत सगळ नायकोभोवतीच फिरणार असत पण त्याच्या जीवनावर प्रभाव टाकणार्या इतर व्यक्तीरेखानाही थोडासा स्पेस हवाच की. तसेच  ब्रेकअपनंतर समुद्र भटकंतीला विदर्भ इ भागात फिरायला जातो तेव्हा मुंबईतल्यासारखच तगड निरीक्षण वाचायला मिळणार अशी वाचकाची आशा फोल ठरते यावर कडी म्हणजे कथानकांची संगती ओढुन ताणुन लावल्याच समजत .कादंबरीत सगळ आहे. समुद्र, ऊर्जा, गजल पण भुमी नाही. म्हणजे लेखकाने ज्या पद्धतीने ही रूपक वापरलीत तस भुमीच एक रूपक वापरायला हव होत. कादंबरीतली सगळी पात्र स्थिर झाली असती. पण हे सुद्धा वास्तव वाटत. चहुबाजुंनी ध्वस्त झालेल्या तुमच्या माझ्या पिढीला कुठ आहे भुमी?  विचाराची , आश्वासक भविष्याची .साला जगण इतक गुंतागुंतीच झालय की आपण पण असेच भटकत मरणार क्लाई चाओच्या नोमैडलैंडसारखे. ती प्रतिभा आहे म्हणुन किमान पटेली तर चालतेय आपली न्हायतर काय?  
पटेलीवर लिहीण्यासारख खुप काही आहे. पण सगळ मीच लिहील तर तुम्ही वाचणार काय?  पटेली वाचा 
दर्जा कादंबरी है भिडु !
                 - विक्रांत शंके
दूरभाष - 9890766640
( लेखक समीक्षक असुन महाराष्ट्र जीवन न्यूज समुहात कार्यकारी  संपादक पदावर कार्यरत आहेत)

Comments

Post a Comment