कोजागिरीची चांदणगाणी
जाळीदार झरोक्यातून जाळीदार चांदणं झिरपावं तशी चांदण्यांची काही शुभ्रधवल गाणीच आता माझ्या मनाच्या अंगणात झिरपू लागली आहेत. ही गाणी माझ्या मनाच्या अंगणात का येतात? 'मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम है?' असा उध्दट सवाल मी त्या गाण्यांना विचारु शकत नाही. दुधावर सहजपणे मऊ-मऊ साय बिलगावी तशी शारदीय चंद्रकळेची ही गाणी माझ्या मनाला बिलगली मात्र आहेत. चित्रसृष्टीत अनेक सुपरस्टार्स येतील नि जातील; पण चंद्र हा चित्रसृष्टीचा तसा जुनाच; पण रोज नवा भासणारा सुपरस्टार आहे. म्हातारपणाच्या ग्रहणाने तो कधी ग्रासल्या जाऊ शकत नाही नि थिएटरातला काळोख त्याला गिळंकृत करु शकत नाही. चित्रसृष्टीतल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सुपरस्टार्सनी हिंदी चित्रपटात विविधरंगी नि विविधढंगी भूमिका केल्यात. आकाशातल्या चंद्राने तरी काय केलं? त्यानेही चित्रसृष्टीच्या मायानगरीत विविधरंगी नि विविधढंगी भूमिका केल्या आहेत की!
पूर्वी चित्रपटात हळुवार काव्यात्मक होऊन चंद्र प्रियकर नि प्रेयसीचा हळुवार सुगंधी प्रणय पहात असे. चंद्र मग त्यांचा प्रणय पाहू लागला की प्रियकराला आपली प्रेयसी पाहून 'चौदहवी का चांद हो या आफताब हो' असा प्रश्न पडल्यावाचून रहात नसे. आपली प्रेयसी चंद्रासारखीच सुंदर भासू लागली की नायकाच्या मुखातून जणू चांदण्यांच्या तरल, काव्यात्मक ओळी झिरपू लागत -
ये रात भीगी-भीगी, ये मस्त फिजायें
उठा धीरे-धीरे, वो चाँद प्यारा-प्यारा
मन्नाडेनं राज कपूरसाठी (चोरी-चोरी, 1956) गायलेलं हे गाणं जरा आठवून पहा. वाऱ्याच्या झुळकेनं गुलाबाला लगडलेली गुलाबाची फांदी झुलावी तसं तुमचं मन तुम्हालाच पत्ता लागू न देता अगदी नकळतपणे स्वतःशीच झुलू लागेल.
------------------------------------------
चांद फिर निकला, मगर तुम न आये
जला फिर मेरा दिल, करुँ क्या मैं हाय
लताचं पेईंग गेस्ट (1957) मधील हे गाणं थोडं आठवून पहा! चंद्रोदय झाला. प्रियकराला भेटण्याची वेळ झालीय; पण प्रियकर मात्र भेटीला न आल्यामुळे चंद्राचे तेच शीतल चंद्रकिरण तिच्या मनाला शीतल चंद्रकिरणांची चूड लावण्याची कठोर खलनायकी भूमिकाच जणू या गाण्यात चंद्राद्वारे करत आहे असं मला आपलं उगीचच वाटू लागतं.
चंद्र स्वतःच स्वतःला कुठेतरी हरवून बसलाय. सगळं आकाश खुलं-खुलं झालं आहे. अशावेळी मला रफ़ीचं देवानंदवर चित्रित झालेलं (काला बाजार, 1960) चंद्राचं आणिक एक गाणं आठवतं -
खोया-खोया चांद, खुला आसमां
आँखों में सारी रात जाएगी
तुमको भी कैसे नींद आएगी
हे गाणं नुसतंच आठवतं नाही तर या गाण्याच्या अनेक रम्य रत्नखचित स्मृती मला आठवतात. या गाण्यातला चंद्र जर स्वतःच कुठेतरी हरवून बसला असेल तर तो हरवलेला चंद्र माझ्या आरस्पानी मनातच हरवला असेल.
चंद्र माझ्या आरस्पानी मनात हरवला असेल किंवा नसेलही; पण रेशमी चंद्राचा एखादाच चंद्रकिरण रात्रीच्या शांत समयी तळ्यात उमललेल्या एखाद्या कमलपुष्पात अडकून पडावा नि कमलपुष्पात अडकून पडलेला तो चंद्रकिरण देखील मग कमलपुष्पाचाच एक परागकण व्हावा तसं काहीसं लताच्या या गाण्याचं झालंय -
दम भर जो उधर मुँह फेरे, ओ चंदा
मै उनसे प्यार कर लूंगी, बातें हज़ार कर लूँगी (आवारा, 1951)
लताचं हे गाणं जरा आठवून पहा. मग, तुम्हाला जाणवेल की पूर्वीच्या जुन्या चित्रपटातील प्रेम हे असे शालीन होते. प्रियकराशी प्रेम करताना देखील आपल्याला कुणी पाहू नये असे त्या काळच्या हिंदी चित्रसृष्टीच्या प्रियतमेला वाटत राही. वडिलधाऱ्या माणसासमोर सिगारेट तर पिऊ नये; पण पिण्याची जबरदस्त हुक्की तर आली आहे, अशावेळी काय करावं? अशावेळी वडिलधाऱ्या माणसाकडे पाठ करुन चोरुन सिगारेट पिऊन घ्यावी. तसे केल्याने सिगारेट पिण्याची हुक्की पूर्ण करता येते नि वडिलधाऱ्या माणसाचा मान ठेवण्याचेही काम साधते. लताच्या 'आवारा' मधील या चंद्रगीताचा मी जेव्हा-जेव्हा विचार करतो ना तेव्हा-तेव्हा वडिलधाऱ्या माणसासमोर चोरुन सिगारेट पिणाऱ्या माणसाचं हे प्रतीक माझ्यासमोर येतं. 'दम भर जो उधर मुँह फेरे, ओ चन्दा' अशी विनंती केल्यावर चंद्र आपले तोंड फिरविल नि मग आपण आपल्या प्रियकरावर निःशंकपणे, निर्धास्तपणे प्रेम करु शकू असे तिला वाटत राहते. लताच्या या चंद्रगीतात मोठ्या माणसाचा मान राखण्याचा हा शालीनपणा निश्चितच आहे.
------------------------------------------
ये रात ये चाँदनी फिर कहाँ
सुन जा दिल की दास्ताँ
हेमंतकुमारने देवानंदसाठी 'जाल' (1952) मध्ये गायिलेलं हे गाणं आठवतं का? बाकी न आठवायला तरी काय झालंय म्हणा? हेमंतदांचा आवाज तलतच्या आवाजासारखा रेशमी नि मखमली नाही. मुकेशच्या आवाजासारखा अनुनासिक तर नाहीच नाही; पण थोडा आत ओढल्यासारखा गूढरम्य मात्र वाटतो. 'जाल' मधील या गाण्यातून जणू तो प्रेयसीला सांगतो -
ही रात्र, ह्या चांदण्या नि ही अशी रात्रीची शांत नीरव वेळ मग आपल्याला कुठे मिळेल? प्रियतमे, तू आताच माझ्या मनाची कहाणी ऐक ना. अशा प्रकारची ही हळुवार तलम भावना हेमंतदाने आपल्या गूढरम्य स्वरांच्या निळ्या धुक्यात लपेटून टाकलीय की काय, हे कळत नाही.
हळुवार प्रेम, उत्कट प्रेम, छचोर प्रेम, विरही प्रेम अशी प्रेमाची कितीतरी रुपे हिंदी चित्रपटात आपण पाहिली आहेत. 'धसमुसळे प्रेम' हे प्रेमाचे आणिक एक रुप!
ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा
ये झील सी नीली आँखें, कोई राज़ है इनमें गहरा
'कश्मीर की कली' (1964) मध्ये शम्मीकपूर 'ता ssरीफ करु क्या उसकी, जिसने तुम्हे बनाया' असे धसमुसळेपणानं गाऊ लागला की आपण देखील सगळी लाजलज्जा सोडून थिएटरात नाचू लागावं असं मला विनाकारणच वाटत राही. नि शर्मिला टागोरचा खळीदार चेहरा तळहातावर धरुन आपण देखील 'ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा' अशी शम्मी स्टाईल आरोळी मारावी असाही मोह होई.
------------------------------------------
मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूँ
मगर चाँद तारे मुझे जानते हैं
आशा भोसलेचं हे प्रसन्न गाणं आहे 'ये रात फिर न आयेगी' (1966) या रहस्यपटातील. आशाचा आवाज मादक नि अंगात तारुण्याची मस्ती फुलविणारा आहे. हे गाणं देखील खळीदार शर्मिला टागोरवरच चित्रित झालं आहे. या गाण्यात आशा भोसले मादक वाटत नाही. शर्मिला टागोर मात्र हे गाणं गातांना अतिशय धुंद, नखरेल नि आपल्या कमनीय तारुण्याने रसिकमानवर गारुड करणारी सम्राज्ञी वाटते.
--------------------------------------
राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व प्रवक्त्यांनी एकमेकांना धमक्या देणे हे आपल्या चांगलेच अंगवळणी पडले आहे; पण इथे साक्षात प्रेयसीच आकाशातल्या चंद्राला धमकी देते हे पाहून आपल्या उरात धडकी भरते. अर्थात तिची ही धमकी राजकीय कार्यकर्त्यांसारखी हिंसक नाही. तिची धमकीसुद्धा अतिशय प्रेमळ आहे. 1956 मध्ये आलेल्या 'शतरंज' या चित्रपटात हेमंतकुमार नि लतादीदीचं एक गोड गाणं अशोककुमार नि मीनाकुमारीवर चित्रित झालं होतं -
लता - बदली में छुपे चाँद ने कुछ मुझ से कहा है
हेमंत - हमने भी सुना है
यात एका कडव्यात मीनाकुमारी आकाशातल्या चंद्राला उद्देशून म्हणते -
मत देख मेरे चाँद को, ओ चाँद जलन से
मैं तोड़ के रख दूंगी तुझे नील गगन से
अरे चंद्रा, माझ्या चंद्रासारख्या सुंदर प्रियकराकडे असूयेने, मत्सराने पाहशील तर मी तुला या निळ्या आकाशातून तोडून टाकेल. ही तिने चंद्राला दिलेली 'प्रेमळ धमकी' नाही, तर काय आहे?
------------------------------------------
1964 मध्ये आलेल्या 'सती सावित्री' या चित्रपटातील गाण्याने माझ्यावर लहानपणापासून गारुड केलं आहे. इथेही लतादीदी आहेतच अन् सोबत आहेत मन्ना दा म्हणजे आपले मन्ना डे. गाणं कोणतं? पूर्ण गाणंच देतो नं -
लता - तुम गगन के चंद्रमा हो, मैं धरा की धूल हूँ
तुम प्रणय के देवता हो, मैं समर्पित फूल हूँ
मन्ना डे - तुम हो पूजा, मैं पुजारी
तुम सुधा, मैं प्यास हूँ
लता - तुम महासागर की सीमा, मैं किनारे की लहर
तुम महासंगीत के स्वर, मैं अधूरी साँस भर
तुम हो काया मैं हूँ छाया, तुम क्षमा मैं भूल हूँ
तुम गगन के चंद्रमा...
मन्ना डे - तुम उषा की लालिमा हो, भोर का सिंदूर हो
मेरे प्राणों की हो गुँजन, मेरे मन की मयूर हो
तुम हो पूजा, मैं पुजारी, तुम सुधा, मैं प्यास हूँ
तुम गगन के चंद्रमा...
प्रियकर नि प्रेयसी यांचे एकमेकांबद्दलचे समर्पण, उत्कटता, वेळ आली तर स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती ही तिच्या 'मैं धरा की धूल हूँ' या शब्दांतून व्यक्त होते, तर तो तिला 'तुम हो पूजा, मैं पुजारी' असे म्हणून तिचे आपल्या जीवनातले स्थान किती उच्च दर्जाचे आहे, हे व्यक्त करतो.
शारदीय चंद्रकळेची ही अशी कित्येक चांदणगाणी आहेत. आपण जेव्हा आपल्या कानांनी ही गाणी पिऊ लागतो तेव्हा ती गाणी कोजागरी पौर्णिमेला आटवलेल्या दुधासारखी मिठ्ठास वाटतात. स्वप्नातच स्वप्न दिसताना एखादी गौरवर्णीय चंद्रमुखी प्रमदा आपल्या डोळ्यांच्या पापण्यांवर उतरुन नाचू लागावी नि तिचा नाच आपल्या पापण्यांवर सुरु असतांना तिच्या पायातील चांदीची नूपुरे मंदपणे किणकिणावीत तशी शारदीय चंद्रकळेची ही चांदणगाणी माझ्या मनाच्या अंगणात शांतपणे किणकिणत मात्र राहतात.
-----------------------------------------


Comments
Post a Comment