माजी दिवाळी

माजी दिवाळी..... 

कुठलाच सन सन वाटना झालाय आताशीक 
कारण जिंदगीच्या संकटाचा सण सुरू झालाय, 

बारक्यापणी कसं निव्वळ नाचायचं दिवाळीला
 बापापुढं हाट करायचा फटाकड्याचा, 
दादानं टांगल्याला आकासकंदिलाला बगत रहायच दिमाखात तुळशीच्या लगनापातुर ..
हे हारवलय सगळच 

आता घरमालक हाट करतोय भाड्यासाठी, तगादा लावतोय मेसवाला .
आणि या सगळ्यातुन वाचलोच तर ट्रैव्हल्सच्या तिकीटाचे दर बघत राहतात दिमाखात माज्याकडं.. अव्वाच्या सव्वा वाढुन 

पैल कसं सकाळी उटायचं दिवाळीत
 आई सुगंधी उटण लावुन आंगोळ घालायची मोती साबणाच्या वडीनं 
नवी कापडं घालुन मिसळायचं फटाकड्या वाजविणार्या पोरात.

आता ही मौज रायली नाही 
सिमिस्टर परीक्षेच भुईचक्कर फिरतय डोक्यात गरगर ..
बैकलोगचे विशय उठवितात पाटं ,अब्यासाच्या वडीनं 
दुपार हुईस्तवर मीबी मिसळलेल्या असतु त्या भुक्याजल्या पोराच्या गर्दीत.
आता पुडं हुईल तस हुईल पर 
खरं सांगतु..  कुटलाच सण सण वाटना झालाय आतासीक
                 - विक्रांत शंके

Comments

  1. आता कसली दिवाळी आणि दसरा , कोणता सण कधी आला आणि कधी गेला हाली कळत पण नाही हो दादा

    ReplyDelete
  2. KHUP MAST KAVITA JAMLIYE saglyanchya manatil bhavana utarlyat tumchya kavitet....👌👌

    ReplyDelete

Post a Comment